मुख्यमंत्री मुक्या बहिऱ्यासारखे वागत आहेत; माजी मंत्री सदाभाऊ खोत यांची टीका  

महाराष्ट्र News 24 वृत्त

राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अनेक मोठी भाषणं केलीयेत. पण शेतात लढणाऱ्या शेतकऱ्यांची मदत का करत नाही? हे सरकार कोरोनाचा बागुलबुवा दाखवत आहे, कोणताही प्रश्न आला तरी कोरोनाचं नाव पुढे केले जाते, सरकार कोरोनाच्या तिरडीवर झोपलंय तर सामान्य माणूस आत्महत्येच्या दरडीवर उभा आहे, अशा शब्दात माजी कृषीराज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी सरकारवर टीका केली आहे.

सहा महिन्यात शेतकऱ्यांच्या भाजीपालाचं, आंब्याचं तसंच फळांचंही नुकसान झालंय. मात्र सरकारकडून कोणतीही बाजारपेठ उभी राहिली नाही. राज्यात 20 टक्क्यापेक्षा जास्त पिककर्ज शेतकऱ्यांना मिळू शकलं नाहीये. शेतीला जोडधंदा म्हणून दूधाचा धंदा केला जातो, पण त्याकडेही सरकार दुर्लक्ष करताना दिसतंय. दूधाचा प्रश्न मुख्यमंत्र्यांना समजत नाही किंवा समजूनही ते मुक्या-बहिऱ्यासारखं करत असल्याचा आरोपही सदाभाऊ खोत यांनी उद्धव ठाकरेंवर केलाय.

दूध उत्पादकांचा आवाज सरकारपर्यंत पोहचला नाही का? या सरकारचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. शेतकऱ्यांचा पुळका घेऊन बोलणारे नेते आज शेतकऱ्यांसाठी काय करताय?, असा संतप्त सवालही सदाभाऊ खोत यांनी उपस्थित केलाय.

दरम्यान, दुधाची नासाडी करु नये, आंदोलनातील दूध रस्त्यावर न फेकता गरिबांना वाटा अशा कार्यकर्त्यांना सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती सदाभाऊ खोत यांनी दिली आहे.

सदाभाऊ खोत यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सरकारवर टीका केल्याने त्यांना  महाविकास आघाडीकडून काय प्रत्युत्तर दिले जाते हे पहाणे महत्वाचे ठरेल.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत