मुख्यमंत्री म्हणजे बँक ‘एजंट’

आमदार बच्चू कडू यांची टीका; ‘शिवसेनेचे वाघ विधानसभेत मांजर’

धर्माच्या नावाखाली राजकारण करणारे राज्यात व केंद्रात सरकार आहे. विविध प्रकल्पांसाठी जमिनी संपादित करीत शेतकऱ्याला बेघर केले जात आहे. शेतकरी प्रश्नांवर लढणाऱ्यांना गुंडाळण्याचे उद्योग सुरू आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणजे बँक ‘एजंट’ असल्याचे टीकास्त्र प्रहार संघटनेचे प्रमुख आ. बच्चू कडू यांनी सोडले.

जनशक्ती प्रहार पक्षाच्या वतीने वाडिवऱ्हे येथे बुधवारी आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी उत्तर महाराष्ट्राचे संपर्कप्रमुख दत्तू बोडके, जिल्हाध्यक्ष सचिन पनमंड, गोपाळ शिंदे, अनिल भडणगे आदी उपस्थित होते. वाढती महागाई सर्वसामान्यांच्या जिव्हारी लागली आहे. महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक वेठीस धरला गेला. सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांना जाणीवपूर्वक बगल देत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लढणाऱ्यांना गुंडाळण्याचे उद्योग होत असले तरी आपण भाजपला पुरून उरू असे कडू यांनी ठणकावले. नाशिक जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी कांदा व्यापाऱ्यांवर छापे टाकले गेले. मुंबई व दिल्लीत कांद्याचे भाव कमी करण्यासाठी सरकारने ही कारवाई केल्याचा आरोपही त्यांनी केला.

शिवसेनेला पाकिस्तानचे खेळाडू भारतात खेळलेले चालत नाहीत, पण पाकिस्तानचा कांदा ते कसा भारतात खपवून घेतात, असा टोला त्यांनी लगावला. शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे विरोधकही भांडवल करीत आहेत. शिवसेनेचे वाघ विधानसभेत मांजर बनले आहेत. मात्र आपण शेतकऱ्यांसाठीच लढत राहणार आहोत. शेतकऱ्यांचे संघटन होऊनही सरकार बधले नाही. सरकारला वठणीवर आणण्यासाठी व न्याय मिळविण्यासाठी शेतकऱ्यांचा कट्टरतावाद उभा करून आरपारची लढाई उभी करण्याचा इशारा त्यांनी दिला.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत