मुख्यमंत्र्याचा ताफा अडवला, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज

जालना : रायगड माझा वृत्त 

दुष्काळी भागाची पाहणी करण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला अडवलं म्हणून काही राष्ट्रवादी नेत्यांमध्ये आणि पोलिसांमध्ये वादावादी झाली. या भांडणाने पुढे हिंसक वळण घेतलं आणि पुढे या नेत्यांवर लाठीचार्ज करण्यात आला.

शनिवारी दुपारी बारा वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जालना शहरात आगमन झाले. हेलिपॅड वरून मुख्यमंत्र्यांचा ताफा थेट जिल्हाधिकारी कार्यालयात जात असताना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी उभे होते. यावेळी पोलिसांनी त्यांना मुख्यमंत्र्यांना भेटण्याची परवानगी नाकारली. यामुळे कार्यकर्ते चिडले. सुरुवातीला पोलिसांसोबत त्यांची शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर हे भांडण टोकाला गेल्यामुळे पोलिसांनी या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज करून त्यांना ताब्यात घेतले.

यावेळी राष्ट्रवादी चे जिल्हा परिषद सदस्य जयमंगल जाधव, घनसावंगी चे राज देशमुख आणि बदनापूर तालुका अध्यक्ष सुभाष बोडखे यांना बराच मार लागला. बोडखे आणि देशमुख यांची हाडे तुटल्यामुळे त्यांना सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा दौरा दुष्काळ निवारण कामासाठी नसून निवडणूक जवळ आल्याच्या कारणाने असल्याची टिका माजी आमदार चंद्रकांत दानवे यांनी केली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत