मुख्याधिकाऱ्यांची बदली रोखण्यासाठी सेनेकडून प्रयत्न

चिपळूण : रायगड माझा

चिपळूण पालिकेचे वादग्रस्त मुख्याधिकारी पंकज पाटील यांचा चिपळुणातील तीन वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे तरीही बदली होऊ नये, यासाठी ते प्रयत्नशील आहेत. विशेष म्हणजे त्यांच्याविरोधी इशारे देणारे शिवसेनेचे मोठे पदाधिकारी त्यांची बदली रोखण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचा आरोप नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांनी पत्रकार परिषदेत केला.

पालिकेच्या जलतरण तलावात कपिल सांबेरकर या युवकाचा बुडून मृत्यू झाला. प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी आहे. आम्ही मुख्याधिकाऱ्यांना कधीही पाठीशी घातलेले नाही. ते बेजबाबदारपणे वागतात, याबद्दल आम्ही वारंवार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या आहेत.

शिवसेनेचे शहरातील प्रमुख पदाधिकारी दिवसा मुख्याधिकाऱ्यांच्या विरोधात इशारे देतात. रात्री हॉटेलमध्ये त्यांच्याबरोबर जेवण आणि पार्टी करतात. ते ज्या दिवशी पालिकेत येणार नाहीत, त्याच दिवशी शिवसेनेचे पदाधिकारी पालिकेत येऊन त्यांच्या विरोधी बोंबा मारतात. पालिकेने अनेक प्रकल्प हाती घेतले आहेत.

मुख्याधिकाऱ्यांच्या माध्यमातून मलिदा लाटता यावा, यासाठी शिवसेनेचे काही लोकप्रतिनिधी प्रयत्न करीत आहेत. म्हणूनच त्यांची बदली न व्हावी, यासाठी सेनेकडून मंत्रालयस्तरावर प्रयत्न सुरू असल्याचे सौ. खेराडे यांनी सांगितले.

चिपळूण नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज पाटील यांच्याविरूध्द सर्वपक्षीय असंतोष धुमसत असून त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या झाल्या होत्या .  विरोधकांसह सत्ताधारी आघाडीच्या काही सदस्यांनी पाटील यांच्या कार्यपध्दतीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे . यावेळी हातातील कागदपत्रे भिरकावणे, सभागृहात उपस्थित  कर्मचाऱ्यांच्या नोंदवह्या, कार्यक्रमपत्रिका हिसकावून फाडण्याचे प्रयत्न करणे, मुख्याधिकाऱ्यांच्या टेबलावरील पुस्तके आपटून त्यांना घेराव घालणे यासारखे अभूतपूर्व प्रकार चिपळूण पालिकेच्या सभेत घडले आहेत .   काहीजणांनी तर त्यांच्यावर थेट भ्रष्टाचाराचेच आरोप केले. विकासकामांची बिले अदा करताना त्यांच्याकडून जाणीवपूर्वक अडवणूक केली जाते, असा या नगरसेवकांचा आरोप आहे.नगर परिषदेत त्यांची वारंवार गैरहजेरी, हाही वादाचा महत्वाचा  मुद्दा आहे. त्यापैकी एका सदस्याने काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन या विषयांना जाहीर तोंड फोडले होते. त्यामुळे मुख्याधिकाऱ्यांविरूध्द वातावरण तापत होते. 

बदली होऊ नये यासाठी शिफारस
दोन वर्षापासून त्यांच्या बदलीसाठी प्रयत्न सुरू आहेत. गेल्या आठवड्यात बदलीच्या मागणीसाठी काही जण मंत्रालयात गेले , तेव्हा शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींकडून बदली होऊ नये, यासाठी शिफारस असल्याची माहिती मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी दिली.

मुख्याधिकारी पंकज पाटील यांनी सर्वच मर्यादा पार केल्या आहेत. त्यांनी पुन्हा पालिकेत येऊ नये. मुंबईतूनच बदली करून घ्यावी. ते पालिकेत आले तर मी त्यांना नक्कीच काळे फासेन.
– सुधीर शिंदे,
 नगरसेवक

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत