मुद्दल फेडतो, व्याज विसरा; विजय मल्ल्याची बँकांना ऑफर

रायगड माझा वृत्त

भारतीय बँकांचे हजारो कोटी रुपयांचे कर्ज बुडवून परदेशात पसार झालेला मद्यसम्राट विजय मल्ल्याने कर्ज फेडण्याची तयारी दर्शवली आहे. मी १०० टक्के कर्ज फेडायला तयार आहे, मी कर्जाच्या मुद्दलीची परतफेड करु शकेन पण व्याजाची रक्कम देऊ शकत नाही, असे विजय मल्ल्याने म्हटले आहे. भारतातील प्रसारमाध्यमे आणि नेते हे पक्षपाती असल्याचा आरोपही त्याने केला आहे.

ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्यातील आरोपीचं प्रत्यार्पण झाल्याच्या पार्श्वभूमीवर विजय मल्ल्याने ट्विटरवरुन बँकांच्या थकीत कर्जावर भाष्य केले आहे. विजय मल्ल्या म्हणतो, किंगफिशर मद्य क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी असून गेल्या तीन दशकापासून कंपनी भारतात व्यवसाय करत आहे. आम्ही अनेक राज्यांना हजारो कोटी रुपये दिले आहे. किंगफिशर एअरलाइन्सनेही अनेक राज्यांना मदत केली होती. पण दुर्दैवाने किंगफिशर एअरलाइन्सचे नुकसान झाले. तरीही मी बँकांना कर्जाच्या मुद्दलीची परतफेड करायला तयार आहे. यामुळे बँकांचेही नुकसान होणार नाही, असे त्याने सांगितले.

एअरलाइन्स कंपनीला विमानाचे इंधन महागल्याचा फटका बसला. यामुळे कंपनीचे आर्थिक नुकसान झाले आणि बँकांकडून घेतलेल्या कर्जाची रक्कम हे नुकसान भरुन काढण्यात खर्च झाली. मी बँकांना मुद्दलीतील १०० टक्के रक्कम भरायला तयार आहे. कृपया बँकांनी माझी ऑफर स्वीकारावी, असे विजय मल्ल्याने म्हटले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत