मुलगी नसल्याने तो पळवायचा दुसऱ्यांच्या मुली

नवी दिल्ली : रायगड माझा ऑनलाईन 

आपल्याला मुलगा असणं ही आजही आपल्या समाजात अभिमानाची गोष्ट समजली जाते. मुलगाच हवा मुलगी नको यासाठी अनेक व्रतवैकल्यही केली जातात. पण दिल्लीत मात्र मुलगी नसल्याचे शल्य बोचत असल्याने एक व्यक्ती दुसऱ्यांच्या मुलींचे अपहरण करत असल्याचे समोर आले आहे. कृष्ण दत्त तिवारी असे त्याचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

पेशाने ड्रायव्हर असलेला तिवारी विवाहित असून त्याला दोन मुलगे आहेत. तो कुटुंबीयांसह राजौरी गार्डन परिसरात राहतो. तिवारीला मुलींची खूप आवड आहे. पण दोन्हीही मुलगेच झाल्याने तो निराश झाला होता. यातूनच मग त्याने दुसऱ्यांच्या मुलींचे अपहरण करणे त्यांना घरी घेऊन येणे, त्यांचे स्वत:च्या मुलीप्रमाणे लाड करणे व नंतर त्यांना त्यांच्या घरी सोडून येणे सुरू केले होते. किर्ती नगर येथील जवाहर कॅम्प परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने शुक्रवारी आपली आठ वर्षीय मुलगी बेपत्ता असल्याची पोलिसात तक्रार केली. मुलगी शौचालयास जाते म्हणून घराबाहेर पडली. पण ती घरी परतलीच नाही, असे त्याने तक्रारीत नमूद केले होते. पोलीस तिचा शोध घेत असतानाच दुसऱ्या दिवशी सकाळी मुलगी सुखरुप घरी परतली. हे बघून घरातल्यांना आनंद झाला. मुलीची चौकशी केल्यानंतर तिने शौचालयास गेली असता एका व्यक्तिने तिला मोटारसायकलवरून फिरवण्याचे आमिष देत स्वत:च्या घरी नेले. तिथे त्याने व त्याच्या कुटुंबीयांनी तिचे खूप लाड केल्याचे व संबंधित व्यक्तिने तिला कुठल्याही प्रकारची हानी केली नसल्याचे पोलिसांना सांगितले. हे ऐकून पोलीसही चक्रावले. आरोपी व्यक्ती माथेफिरू असावी, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. त्यानंतर ज्या परिसरातून मुलीचे अपहरण करण्यात आले होते. तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यात एक व्यक्ती मुलीला तिच्या घराजवळ सोडत असल्याचे समोर आले.

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर आरोपी तिवारीला अटक केली. त्याने आपल्याला मुलगी नसल्याने या आधीही आपण एका मुलीचे अपहरण केल्याचे व तिला दोन तीन दिवस घरात मुलीप्रमाणे ठेवल्यानंतर घरी सोडल्याचे सांगितले. तसेच कुटुंबाने मुली कोणाच्या आहेत असे विचारल्यावर मित्र परगावी गेल्याने त्याच्या मुली आपल्याकडे राहायला येत असल्याचे तो घरातल्यांना सांगायचा, असेही तिवारीने पोलिसांना सांगितले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत