मुलीच्या लग्‍नाची मेजवानी रद्द; जवानांच्या कुटुंबीयांसाठी ११ लाख

सुरत : रायगड माझा वृत्त

पुलवामा हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांसाठी गुजरातमधील एका कुटुंबाने मुलीच्या लग्‍नाची मेजवानी रद्द करून 11 लाख रुपये दिले आहेत. शिवाय, अन्य सेवाभावी संस्थांनाही या कुटुंबाने लग्‍नातील अनावश्यक खर्च टाळून 5 लाख रुपयांची देणगी दिली.

पुलवामा हल्ल्यामुळे देशभरात दहशतवादी आणि पाकिस्तानविरुद्ध संतापाची भावना आहे. त्याचबरोबर देशासाठी प्राणांची आहुती दिलेल्या जवानांच्या कुटुंबीयांसाठी देशवासीयांच्या मनात दुःखाची भावना आहे. सुरतमधील एका हिरे व्यापार्‍यानेही या हल्ल्यानंतर लेकीच्या लग्‍नातील थाटामाटाला रजा दिली. ‘पद्मावती डायमंड’चे मालक सेठ देवशी माणेक यांची कन्या अमी हिचा शुक्रवारी विवाह झाला. लग्‍नासाठी वर्‍हाडी मंडळींना मोठीच मेजवानी देण्यात येणार होती. मात्र, गुरुवारीच पुलवामा हल्ल्याचे वृत्त आल्यावर ही मेजवानी रद्द केल्याचे सर्वांना कळवण्यात आले. या मेजवानीऐवजी शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी संयुक्‍तपणे 11 लाख रुपये देण्याचा निर्णय माणेक कुटुंबाने घेतला. तसेच अन्य काही समाजसेवी संस्थांनाही पाच लाख रुपये देण्यात आले. पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी देश कसा उभा आहे याचे हे एक उदाहरण!
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत