मुलीला डोळा मारला म्हणून ३ वर्षे सक्तमजुरी

बीड : रायगड माझा वृत्त 

Crime

मुलीकडे एकटक बघून डोळा मारणाऱ्या एका तरुणास तीन वर्षे सक्तमजुरी आणि पाचशे रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. जिल्हा व सत्र न्यायाधीश प्राची कुलकर्णी यांनी हा निकाल दिला. दंडाची रक्कम न भरल्यास तुरुंगवासाच्या शिक्षेत एक महिन्याने वाढ होणार आहे.

पुरुषोत्तम ज्ञानदेव वीर (वय २४, रा. टाकळगाव, ता. शिरूर कासार) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

यंदा एप्रिल महिन्यात २० तारखेला ही घटना घडली होती. शिरूर कासार तालुक्‍यातील रायमोह येथील रस्त्यावर थांबलेल्या मुलीकडे पुरुषोत्तम वीर एकटक पाहत होता. त्यानंतर त्याने मुलीला डोळा मारला. तिने याबाबत पाटोदा पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून पुरुषोत्तम वीर याच्यावर गुन्हा नोंद झाला. याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले.

सरकारी पक्षातर्फे सात साक्षीदार तपासण्यात आले. साक्षी आणि पुरावे ग्राह्य धरून प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश प्राची कुलकर्णी यांनी आरोपीस दोषी ठरवत तीन वर्षे सक्तमजुरी आणि पाचशे रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे ॲड. अनिल धसे यांनी काम पाहिले. त्यांना ॲड. संगीता धसे यांनी सहकार्य केले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत