“मुली पळवण्याचा प्रकार घडला, तर पहिला गुन्हा राम कदमांवर दाखल व्हावा”

मुंबई : रायगड माझा वृत्त

इथून पुढे महाराष्ट्रात मुली पळवून नेण्याचे प्रकार झाले, तर त्याचा पहिला गुन्हा आमदार राम कदमांवर दाखल करण्यात यावा, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राम कदमांवर निशाणा साधला. जयंत पाटील यांनी राम कदमांच्या मुली पळवण्याच्या वक्तव्यावर सडकून टीका केली.

जयंत पाटील काय म्हणाले?

“भाजपाचे आमदार राम कदम यांनी काल दहीहंडीत मुक्ताफळे उधळली आहेत. लग्नासाठी मुलींना पळवून नेण्याची विधाने करणारे राम कदम हे कोणत्या संस्कृतीचे प्रतिनिधी आहेत? इथून पुढे महाराष्ट्रात मुली पळवून नेण्याचे प्रकार झाले तर त्याचा पहिला गुन्हा राम कदमांवर दाखल करण्यात यावा.”, अशी टीका जयंत पाटील यांनी केली.

तसेच, जयंत पाटील पुढे म्हणाले, “आमदार महोदय, आपण जो धडा आमच्या युवकांना देत आहात, त्याचे पालन महाराष्ट्रात कधीही होणार नाही. कारण, महाराष्ट्रातील युवक हा छत्रपती शिवरायांचा मावळा आहे, तो भाजपाचा कार्यकर्ता नाही.”“मुख्यमंत्री ज्या दहीहंडीला हजेरी लावतात, त्या कार्यक्रमात मुलींना पळवून नेण्याबाबत फूस लावणारे वक्तव्य त्यांचे आमदार करतात, मुख्यमंत्री याचे समर्थन करतात का?” असा सवालही जयंत पाटील यांनी उपस्थित केला.

भाजप आमदार राम कदम यांनी घाटकोपरमधील दहीहंडी दरम्यान आक्षेपार्ह वक्तव्य केलं. तुम्हाला एखादी मुलगी पसंत असेल आणि तिचा लग्नाला नकार असेल तरीही मला सांगा मी त्या मुलाली पळवून आणण्यास मदत करतो, असं म्हणत भाजपचे आमदार राम कदम यांनी काल घाटकोपरमध्ये दहीहंडी उत्सवात मुक्ताफळं उधळली.

राम कदम नेमकं काय म्हणाले

“कोणत्याही कामासाठी भेटू शकता. साहेब, साहेब मी तिला प्रपोज केलं, ती मला नाही म्हणते, प्लिज मदत करा. शंभर टक्के मदत करणार. आधी मी सांगेन तुम्ही तुमच्या आई वडिलांना घेऊन या. जर आई-वडील म्हणाले की ही मुलगी मला पसंत आहे, तर तिला पळवून आणणार आणि तुम्हाला देणार. त्या मुलीला पळवून आणण्यास मी मदत करेन. त्यासाठी माझा फोन नंबर घ्या आणि संपर्क साधा”, असं राम कदम म्हणाले.

राम कदम यांचं स्पष्टीकरण

दरम्यान, या प्रकारानंतर राम कदम यांनी हा व्हिडीओ अर्धवट दाखवल्याचा आरोप केला. या व्हिडीओच्या मागचा आणि पुढचा भाग ऐकला तर संदर्भ लागेल, अर्धवट दाखवून जनतेची दिशाभूल करु नका, असं राम कदम म्हणाले.यानंतर एबीपी माझाने राम कदम यांना संपूर्ण व्हिडीओ दाखवला. त्यानंतर राम कदम यांनी आपला म्हणण्याचा तसा अर्थ नव्हता. त्यावेळचं वातावरण हलकं फुलकं होतं. काही राजकीय पक्ष या व्हिडीओचं राजकारण करत आहेत, असं राम कदम म्हणाले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत