मुसळधार पावसामुळे कल्याण-कर्जत दरम्यान रेल्वेसेवा ठप्प

कर्जत : रायगड माझा वृत्त

मुंबई, ठाणे आणि आजूबाजूच्या परिसरात पावसाची संततधार सुरुच आहे. ठाणे आणि रायगड परिसरात पडत असलेल्या मुसळधार पावसाचा फटका मध्य रेल्वेला बसला आहे. मध्य रेल्वेची कर्जत आणि कल्याण दरम्यानची रेल्वेसेवा ठप्प झाली आहे. 
मुसळधार पावसामुळे कल्याण-कर्जत दरम्यान रेल्वेसेवा ठप्प
कर्जत आणि विठ्ठलवाडीजवळ रेल्वे रुळावर पाणी साचल्याने कर्जतकडून मुंबईकडे जाणारी रेल्वेसेवा ठप्प झाली आहे.कर्जत रेल्वे स्थानकात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं असून रुळ पाण्याखाली गेले आहेत. चौक स्थानकातही अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. रुळावर पाणी साचल्याने प्रगती एक्स्प्रेस आणि नांदेड-पनवेल एक्स्प्रेस कल्याणमार्गे वळवण्यात आल्या आहेत. 
 
पुणे-भुसावळ एक्स्प्रेस ही दौंडमार्गे वळवण्यात आली आहे.मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाल्याने कामानिमित्त मुंबईकडे येणाऱ्या नागरिकांची कोंडी झाली आहे. कामानिमित्त बाहेर पडलेल्या नागरिकांनाही मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे.
 
वीकेंड असल्याने पिकनिकसाठी बाहेर पडणाऱ्यांनाही आपल्या निश्चित स्थळी पोहचणे कठीण झाले आहे.मुसळधार पावसामुळे मुरबाड तालुक्यातील उल्हास नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. मुरबाड-कल्याण रस्त्यावर पाणी साचलं आहे. त्यामुळे मुरबाड ते कल्याण रस्तादेखील वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची मुंबईच्या दिशेने येणारी आणि जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. रेल्वे स्थानकांवर नीट माहिती मिळत नसल्याने आणि मुसळधार पावसामुळे प्रवाशांची वाट लागली आहे. कर्जत-चौक स्थानकादरम्यान आणि कल्याण-विठ्ठलवाडी स्थानकादरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचल्याने त्याचा परिणाम लोकल वाहतुकीवर झाला आहे.

 
कर्जत आणि चौक स्थानकादरम्यान रुळावर पाणी साचल्याने लांब पल्ल्याच्या गाड्या पनवेलऐवजी कल्याणमार्गे कर्जतच्या दिशेने वळवण्यात आल्या आहेत. मात्र सकाळी ९ नंतर अंबरनाथ स्थानकावर पाणी आल्याने एक्सप्रेस गाड्या देखील रद्द केल्या आहेत. कल्याण वरून कर्जत कडे आणि कर्जत वरून कल्याणकडे जाणाऱ्या लोकल गाड्या अनिश्चित काळासाठी रद्द केल्या आहेत.

मान्सून LIVE अपडेट : 

 • खेडमधील बोरघर येथे रस्त्यावर पाणी तुंबल्यामुळे वाहतूक ठप्प
 • गुहागर-मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प
 • विठ्ठलवाडी स्थानकाजवळ रेल्वे रुळावर पाणी साचले
 • कर्जत ते कल्याणदरम्यान मध्य रेल्वेची दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प
 • महाड बाजारपेठ, भाजी मंडई, दस्तुरी भागात पाणी भरण्याची शक्यता
 • कल्याण-नगर महामार्गावर किशोर गावाजवळ मुरबाडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली
 • पुणे-भुसावळ पॅसेंजरही दौंड-मनमाडमार्गे वळवण्यात आली
 • नांदेड-पनवेल कल्याणमार्गे वळवण्यात आली
 • प्रगती एक्सप्रेसची वाहतूक वळवली
 • महाड शहरातील गांधारी नदीवरचा पूल पाण्याखाली गेला
 • काळ, सावित्री नदीने धोक्याची पातळी गाठली
 • महाड-पोलादपूर भागात पावसाचा जोर वाढला
 • अलिबाग, खोपोली उरणमध्ये जोरदार पाऊस
 • चौक-कर्जत स्थानकादरम्यान रेल्वे रुळावर १० ते १२ इंच पाणी साचले
 • अमन लॉज आणि माथेरानदरम्यान रुळावर झाड कोसळले
 • माथेरानची टॉय ट्रेन सेवा तात्पुरती थांबवली, ट्रॅकवर झाड कोसळल्याने घेतला निर्णय
 • मुरबाडमधील उल्हास नदी दुथडी भरून वाहायला लागली
 • कल्याण, अंबरनाथ, कर्जतमध्ये मुसळधार पाऊस
 • मुरबाड आणि कल्याणदरम्यानची वाहतूक बंद
 • रायगड जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत