मुस्लीम आरक्षणासाठी आमदार आक्रमक

मुंबई : रायगड माझा वृत्त 

Image result for rajya vidhi mandal
राज्य विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही आरक्षणाचा मुद्दा अधिक तापलेला दिसला. मराठा, धनगर आरक्षणानंतर आता मुस्लीम समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी मुस्लीम आमदार आक्रमक झाले. सभागृहातील सहा मुस्लीम आमदारांनी विधानसभा अध्यक्षांसमोरील राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. सभागृहात गदारोळ झाल्यानं कामकाज तहकूब करावं लागलं.

दुष्काळ, आरक्षणासह विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी विरोधकांनी विधिमंडळाच्या दुसऱ्या दिवशीही विधानभवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या मांडला. यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणा दिल्या. विधानसभेचं कामकाज सुरू होताच, आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झाले. मुस्लीम आरक्षणावरून अबू आझमी, आसिफ शेख, अमीन पटेल, अस्लम शेख अब्दुल सत्तार या आमदारांनी विधानसभा अध्यक्षांसमोरील राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं सभागृहात गदारोळ झाला. त्यामुळं विधानसभेचं कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं.

दरम्यान, मराठा-धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरूनही विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला. मराठा आरक्षणासंदर्भात मागास प्रवर्ग आयोगाचा अहवाल पटलावर ठेवल्यास घटनात्मक पेच निर्माण होत असेल तर तो ठेवू नका. आमदारांना मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे, पण ५२ टक्के आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्यावं, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. तुम्ही जाहीर केलेलं आरक्षण न्यायालयात तरी टिकावं अशी अपेक्षा असून, आम्हाला आरक्षणावर राजकारण करायचं नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. तर सरकारनं मागासप्रवर्ग आयोगाचा अहवाल कालच विधानसभेत मांडायला हवा होता, असं विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले. धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबतचा अहवाल सरकारकडे सादर करण्यात आला आहे. त्यावर सरकारने स्पष्ट भूमिका घेऊन त्यातील शिफारशी त्वरित केंद्राकडे पाठवाव्यात आणि धनगरांना आरक्षण द्यावे, अशी मागणी ज्येष्ठ नेते आणि आमदार गणपत देशमुख यांनी केली. त्यावर विरोधकांच्या मागण्यांवर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भूमिका मांडली. मागास प्रवर्ग आयोगाचा अहवाल विधानसभेत सादर करावा का, यावर चर्चा होऊ शकते. मुख्यमंत्र्यांनी अहवालातील शिफारशी सांगितल्या आहेतच! ५२ टक्के आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देऊ असं त्यांनी आधीच स्पष्ट केलं आहे, असं पाटील म्हणाले. मराठा आणि धनगर आरक्षणासंदर्भात अजित पवार आणि देशमुख यांनी मांडलेल्या भूमिकेशी सहमत असल्याचंही ते म्हणाले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत