मूर्तीबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने कलबुर्गी यांची हत्या, आरोपीने दिली कबुली

रायगड माझा वृत्त

कन्नड विचारवंत आणि लेखक एम.एम.कलबुर्गी यांनी मूर्ती पूजेसंबंधी आक्षेपार्ह विधान केल्यामुळे त्यांची हत्या करण्यात आली असे या प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीने पोलिसांना सांगितले. कलबुर्गी हत्येप्रकरणी कर्नाटक सीआयडीने दोघांना अटक केली आहे. अटकेत असलेल्या दोघांपैकी गणेश मिसकिन (२७) या आरोपीने कलबुर्गी यांनी मूर्तीपूजेसंबंधी आक्षेपार्ह विधान केल्यामुळे त्यांची हत्या झाल्याचे पोलिसांना सांगितले.

जून २०१४ मध्ये अंधश्रद्धा विरोधी विधेयकावर चर्चा सुरु असताना कलबुर्गी यांनी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते यू.आर.अनंतमूर्ती यांचा संदर्भ देऊन मूर्ती पूजेसंबंधी आक्षेपार्ह विधान केले होते. त्या वक्तव्यामुळे कलबुर्गी यांना हिंदू विरोधी ठरवून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला असे गणेशने कर्नाटक सीआयडीला सांगितले.

३० ऑगस्ट २०१५ रोजी उत्तर कर्नाटकात धारवाड येथे रहात्या घराबाहरे कलबुर्गी यांची गोळया झाडून हत्या करण्यात आली होती. कलबुर्गी हत्ये प्रकरणी गणेश मिसकिन आणि अमित बद्दी (२८) या दोघांना १५ सप्टेंबर रोजी कर्नाटक सीआयडीने अटक केली आहे. गौरी लंकेश हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीने दिलेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. गणेश मिसकिन आणि अमित बद्दी दोघे उत्तर कर्नाटकाचे रहिवासी असून कट्टरपंथीय हिंदू संघटनेची संबंधित आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत