मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात 13 बालकांचा बळी, संतप्त नागरिकांकडून रास्ता रोको

सीतापूर : रायगड माझा

उत्तर प्रदेशमध्ये मोकाट कुत्र्यांनी आणखी एक निष्पाप बालकाचा बळी घेतला आहे. रविवारी सकाळी सीतापूर जिल्ह्यातील खैराबाद पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या महेशपूर गावात गव्हाच्या शेतात काम करत असलेल्या चार मुलींवर सात-आठ कुत्र्यांनी हल्ला केला. 10 ते 12 वर्षांच्या मुली जीवाच्या अकांताने धावल्या मात्र कुत्र्यांनी एका 12 वर्षाच्या मुलीवर हल्ला केला आणि तिचे लचके तोडले. गावकरी तिथे येईपर्यंत कुत्र्यांनी मुलीचे एवढे लचके तोडले होते की निष्पाप बालिकेचा तिथेच मृत्यू झाला होता. बालिकेच्या मृत्यूनंतर संतप्त गावकऱ्यांनी मृतदेह महामार्गावर ठेवून रस्ता जाम केला आणि घोषणाबाजी केली.

आतापर्यंत 13 मुलांचा मृत्यू 
– सीतापूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांनी हैदोस घातला आहे. कुत्र्यांनी आतापर्यंत 13 मुलांचा बळी घेतला आहे. अनेक मुलं कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेले आहेत.
– 11 मे रोजी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सीतापूर येथे येऊन मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी मुलांची भेट घेतली.

मुख्यमंत्र्यांनी दिले कुत्रे पकडण्याचे निर्देश 
– कुत्र्यांच्या मुलांवरील हल्ल्याची गंभीर दखल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतली आहे. त्यांनी मोकाट कुत्र्यांना पकडण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानंतर 35 कुत्रे पकडण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर पोलिस आणि प्रशासन कामाला लागले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत