मोग्रज  मध्ये  यशस्वी होतंय जलसंधारण अभियान

कर्जत: अजय गायकवाड 

आशिष लाड या धेय्यवादी तरुणाच्या जिद्दीला लाभलेली गावकऱ्यांची साथ , प्रांताधिकारी वैशाली परदेशी यांचे सहकार्य या जोरावर कर्जत तालुक्यातील मोग्रज गावाने पाणीटंचाईवर उपाय शोधला आहे. श्रमदानातून जलसंधारणाचे काम करून गावाला पाणी टंचाईतून मुक्ती देण्याचा सर्वांचा प्रयत्न कौतुकाचा विषय ठरत आहे. .

सह्याद्रीच्या कुशीत आणि मुशीत विविध रंगाची अन विविध ढंगाची झालर पांघरुन डोलत असलेला तालुका म्हणजे कर्जत . कृषी प्रधान तालुका म्हणून ओळख असलेल्या कर्जत तालुक्यात अनेक गावांना आणि आदिवासी वाड्या वस्त्यांना तीव्र स्वरूपाची पाणी टंचाई भेडसावते. उन्हाळ्यात या गावांना पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागतात. मोग्रज ही ग्रामपंचायत देखील त्यापैकीच एक. बायाबापड्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. या गावाने मात्र पाणी टंचाई दूर करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. स्वत:च्या गावचा पाण्याचा प्रश्न गाव स्तरावर सोडविण्यासाठी जलसंधारण अभियान राबविण्याचे ठरविले. अशी दुरदूष्टी आणि दुर्दम्य इच्छा शक्ती असणाऱ्या गावकऱ्यांच्या अविरत श्रमदानातून एक नवे अभियान कर्जत मध्ये आकाराला येत आहे. आशिष लाड या धेय्यवादी तरुणाची यामागे प्रेरणा होती. आशिष लाड पाणी फाउंडेशन साठी काम करतोय .

महाराष्ट्रात ही चळवळ पुढे जात असताना आपल्या कर्जत मधील पाणी टंचाईवर ठोस उपाय करण्याची योजना त्याच्या मनात होती. पत्रकार संतोष दळवी यांच्या समोर त्याने हा प्रश्न मांडला . कोणत्याही कामाला लोकसहभागाबरोबर प्रशासकीय पाठबळ लाभले तर ते काम अधिक पुढे जाते . यामुळे दोघांनी कर्जत च्या उपविभागीय अधिकारी वैशाली परदेशी यांना या उपक्रमाविषयी अवगत केले. त्या देखील आवश्यक ते सर्व सहकार्य करायला तयार झाल्या. मग गाव निवडले, ग्रामसभा झाली . ग्रामसभेत निर्णय झाला . आशिष लाड यांच्या माध्यमातून गावातील नागरिकांना याचे प्रशिक्षण देण्यात आले. आणि मग पावसाचे पाणी जमिनीत जिरविण्यासाठी ओसाड माळरानाच्या उतारावर तंत्रशुद्ध पद्धतीने समतल चर खोदण्यात आले. गावाने श्रमदान केले. खोदण्यात आलेल्या मातीचे छोटे बंधारे करून त्यावर भुईमुगाची लागवड करण्यात आली . छोटा तलाव करून त्यात पाणी अडविण्याचा आणि जिरविण्याची प्रयत्न केला आहे. आमदार सुरेश लाड यांनी प्रांताधिकारी वैशाली परदेशी यांच्यासह या उपक्रमाची पाहणी केली. या कामाबद्दल त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले.  प्रांताधिकारी वैशाली परदेशी आणि या गावातील तलाठी , मंडल अधिकारी या सर्वानी सर्वतोपरी सहकार्य दिल्याने भल्याची वाडी या गावाने पाणी टंचाई वर मात करण्यासाठी एक पाऊल टाकले आहे. यावर्षी केलेल्या या कामाचा कितपत उपयोग होतो हे यापुढील काळात समजेल. पण मोग्रज ग्रामपंचायती मधून सुरु झालेले हे अभियान लोकचळवळ झाल्यास कर्जत मधील दुर्गम भागातील पाणी टंचाईवर मात करता येईल हे मात्र नक्की .

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत