मोदींचा हात लागला, की एकही काम होत नाही : मुंडे

बीड : रायगड माझा वृत्त

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबईत भूमिपूजन केलेले एकही काम अद्याप सुरु झालेले नाही. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, मेट्रो प्रकल्प यांपैकी काम सुरु नाहीत. त्यांचे हात लागलेले एकही काम सुरु नाही, अशी टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मंगळवारी केली.

जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत मुंडे यांच्यासह पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित, उपाध्यक्ष प्रकाश सोळंके, राजेंद्र जगताप, पृथ्वीराज साठे, अशोक डक, बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागर, सतीश शिंदे आदींनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन उपाययोजनांबाबत चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मुंडे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दुष्काळी आढावा बैठकीनंतर दिलासा भेटेल ही अपेक्षा फोल ठरली आहे. दुष्काळ जाहीर करण्यात आला असला तरी दुष्काळासंदर्भातील आदेशांपैकी एकाचीही अंमलबजावणी नाही. नवीन एकही विंधन विहीर किंवा सार्वजनिक खोदली गेली नसून, रोहयोची कामेही सुरु नसल्याचे मुंडे म्हणाले.

तीन महिन्यांपासून दुष्काळाने जिल्हा होरपळत आहे, खरीपाचे पिक हातचे गेले असून, रब्बीची पेरणी नाही. दुष्काळ जाहीर झाला असला तरी कुठल्याही उपाययोजना नाहीत. दुष्काळाने जिल्हा होरपळत असताना पालकमंत्री आणि आमदारांचे या परिस्थितीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

टँकरच्या मागणीनंतर २४ तासांत सुरवात करण्यासाठी यंत्रणा उभारावी, रोहयोची कामे सुरु करावी, वाळत असलेल्या ऊसाचे पंचनामे करुन मदत द्यावी, कापूस पीक उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार तर ऊस व फळबागाधारक शेतकऱ्यांना एक लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

मुख्यमंत्र्यांवरही टीका

कमलनाथ यांनी मुख्यमंत्री होताच दोन तासांत शेतकऱ्यांची कर्जमाफी केली आणि आपल्या मुख्यमंत्र्यांना अभ्यासाला साडेतीन वर्षे लागली. हा दोन विद्यार्थ्यांमधील फरक असल्याचा टोला त्यांनी लगावला. तर, ऊसतोड मजूरांचा वापर केवळ मेळाव्यापुरता केला जातो. सत्तेच्या माध्यमातून ऊसतोड मजूरांच्या हाती काहीच आले नाही, अशी अप्रत्यक्षपणे टीका त्यांनी पंकजा मुंडे यांच्यावर केली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत