मोदींनी सर्वच महत्वाच्या संस्था मोडीत काढल्या: राहुल गांधी

रायगड माझा  वृत्त 

लंडन: पंतप्रधान मोदी यांनी भारतातील न्याय व्यवस्था, निवडणूक आयोग, रिझर्व्ह बॅंक अशा संस्थां मोडीत काढल्याचा आरोप कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. इंडियन ओव्हरसिज कॉंग्रेसच्यावतीने येथे आयोजित करण्यात आलेल्या एका मेळाव्यात बोलताना त्यांनी हा आरोप केला. सन 2014 पर्यंत भारतात काहींच विकास झाला नाही हा मोदींचा दावा म्हणजे देशाच्या विकासात योंगदान देणाऱ्या प्रत्येक भारतीयांचाच अवमान आहे असे त्यांनी म्हटले आहे.

ते म्हणाले की भारतानेच जगाला भविष्याची स्वप्न दाखवली आणि भारतातील जनतेने ही स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न केला. कॉंग्रेसने त्यांना पुर्ण साथ दिली पण मोदी म्हणतात मी देशाचा पंतप्रधान होई पर्यंत भारताने कोणतीच प्रगती केली नाही. अशा वक्तव्यांद्वारे ते केवळ कॉंग्रेसवर टीका करीत नाहींत तर विकास प्रक्रियेत योगदान देणाऱ्या प्रत्येक भारतीयांचा ते अवमान करीत आहेत असे ते म्हणाले.

ते म्हणाले की आज भारतात दलित, शेतकरी, अदिवासी, अल्पसंख्य किंवा गरीबांना दाबून टाकले जात आहे. आपल्यावरील अन्यायाच्या विरोधात त्यांनी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला तर त्यांना मारले जात आहे. अनुसुचित जाती जमातीच्या संरक्षणासाठी करण्यात आलेल्या कायदेशीर तरतूदीत अडथळे आणले जात असून या वर्गाच्या शिष्यवृत्तीसारख्या योजनांवरही घाला घातला जात आहे. आज भारतात जात, धर्म या आधारावर लोकांमध्ये भेदभाव केला जात आहे, त्यांचा विश्‍वासघात केला जात असून केवळ अनिल अंबानी यांच्या सारख्यांचे हित जोपासले जात आहे. यावेळी बोलताना त्यांनी राफेल घोटाळ्याचाही उल्लेख केला.


शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत