मोदींसाठी सत्ता महत्त्वाची, देश नाही: पाकिस्तानच्या मुद्द्यावरून आव्हाड बरसले

रायगड माझा वृत्त 

डॉलरच्या तुलनेत रुपया घसरला आहे, अर्थव्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत, मुंबईत पेट्रोलने नव्वदी ओलांडली, राफेलच्या भडिमारातून पळताना मोदी सरकारच्या नाकी नऊ आले आहेत. अशावेळी जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवायला भारत-पाकिस्तान दुष्मनी हा संवेदनशील विषय नरेंद्र मोदींनी कावेबाजपणे निर्माण केला, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला. हा तणाव आता वाढत जाईल, मोदी भक्त तो वाढवतील आणि त्याचा पुरेपूर फायदा मोदी निवडणुकीत घेतील. त्यांच्याकरता सत्ता महत्त्वाची आहे, देशाचं भलं नाही, अशी टीका त्यांनी केली.

जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी फेसबुकवरील पोस्टच्या माध्यमातून मोदी सरकारवर टीका केली. पंडित नेहरूंच्या परराष्ट्र धोरणाचा सतत उद्धार करणारे नरेंद्र मोदी, आपलं धोरण मात्र देशाचं किती नुकसान करतंय हे तपासत नाहीत असे सांगत आव्हाड यांनी पाकिस्तानचा मुद्दा उपस्थित केला.

आव्हाड पोस्टमध्ये म्हणतात, येत्या काही दिवसांत संयुक्त राष्ट्र संघटनेची आमसभा न्यूयॉर्कला होणार असून भारत आणि पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी तिथे परस्परांची भेट घेऊन भारत-पाक संवाद पुन्हा सुरू करावा, अशी विनंती पंतप्रधान इम्रान खानने मोदी यांना एका पत्राद्वारे केली. मोदी यांनी तीन दिवसांत ती मान्य केली. पण चार दिवसांपूर्वी अचानक ही भेट होणार नाही असं भारतीय परराष्ट्र खात्यातर्फे जाहीर करण्यात आले. सीमा सुरक्षा दलाचा जवान नागेंद्र सिंग याचा गळा कापलेला देह आणि काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने मारलेला दहशतवादी बुरहान वानी याच्या स्मरणार्थ पाकिस्तान सरकारने छापलेली टपाल तिकिटे या पार्श्वभूमीवर ही भेट रद्द केल्याचे भारताने सांगितले. पण यात गडबड असल्याचे आव्हाड यांनी म्हटले आहे.

आव्हाड यांनी पोस्टमध्ये काही प्रश्नही विचारले आहेत. ते म्हणतात, बेपत्ता झालेल्या नागेंद्र सिंग यांचा देह सीमा सुरक्षा दल आणि पाकिस्तानी रेंजर्स यांनी एकत्र तपास करून शोधून काढला होता. इम्रानचं पत्रं येण्याच्या काही दिवस आगोदर त्याच्या मृत्यूचा अहवाल भारत सरकारला सादर झाला होता. त्याच्या मृत्युला पाकिस्तान जबाबदार होतं असं जर अहवालात म्हटलं असेल तर मुळात मोदी यांनी इम्रानचा प्रस्ताव स्वीकारलाच कसा?, बुरहान वानीची टपाल तिकिटं, इम्रान पंतप्रधान होण्याच्या आधी कित्येक दिवसांपूर्वी, निवडणुकीच्या काळात काळजीवाहू सरकार असताना छापली गेली होती. त्याच्या बातम्या सुद्धा छापून आल्या होत्या. इम्रानचा प्रस्ताव स्वीकारण्यापूर्वी भारत सरकारला याची कल्पना नव्हती?.

आता भारत – पाकमध्ये सहा महिने चर्चा होणे अशक्य असून मोदी यांनाही तेच हवे होते. २०१९ पर्यंत उभय देशात वातावरण तापत ठेवणं ही त्यांची राजकीय गरज आहे. त्यामुळे स्वराज-कुरेशी चर्चेची संधी काहीतरी निमित्त शोधून त्यांनी सोडून दिली. त्यांची राजकीय गरज देशाच्या हितापेक्षा मोठी असल्याचा आरोप त्यांनी केला.

देशाच्या अर्थव्यवस्थेचे तीनतेरा वाजले असून मुंबईत पेट्रोलने नव्वदी ओलांडली. राफेलच्या भडिमारातून पळताना मोदी सरकारच्या नाकी नऊ आले आहेत. ते दाखवतात तसे स्वच्छ नाहीत हे सिद्ध झाले. अशावेळी जनतेचं लक्ष दुसरीकडे वळवायला भारत-पाकिस्तान दुष्मनी हा संवेदनशील विषय त्यांनी कावेबाजपणे निर्माण केला. आता पुन्हा जो तणाव वाढेल, मोदी भक्त तो वाढवतील, आणि त्याचा पुरेपूर फायदा मोदी निवडणुकीत घेतील. त्यांच्याकरता सत्ता महत्त्वाची आहे, देशाचं भलं नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत