मोदी सरकारवर ‘वार’ करणाऱ्या यशवंत सिन्हांवर पूत्र जयंत सिन्हांचा पलटवार!

भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी मोदी सरकारवर केलेला वार त्यांचे पुत्र आणि केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा यांनी परतवून लावला आहे. नोटाबंदी आणि जीएसटीवरुन यशवंत सिन्हा यांनी मोदी सरकारला लक्ष्य केल्यावर जयंत सिन्हा यांनी अर्थव्यवस्थेत आलेल्या पारदर्शकतेचा उल्लेख करत सरकारचा बचाव केला. अर्थव्यवस्थेला स्थिरता प्राप्त करुन देण्यासाठी सरकारने उचललेल्या पावलांचा उल्लेख करत यामुळे देशाला फायदा होईल, अशी ‘बॅटिंग’ मोदी सरकारचे मंत्री असलेल्या जयंत सिन्हा यांनी केली.

नोटाबंदी, जीएसटी, डिजिटल पेमेंट यांचा देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होईल. देशातील जनतेला या निर्णयाचा लाभ मिळेल, अशा शब्दांमध्ये जयंत सिन्हा यांनी मोदी सरकारच्या कामगिरीचे कौतुक केले. जयंत सिन्हा यांनी वडिल यशवंत सिन्हा यांचे नाव न घेता त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. ‘जे लोक लेख लिहून अर्थव्यवस्थेच्या स्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत, ते लोक अर्थव्यवस्थेत बदल घडवण्यासाठी उचलण्यात आलेल्या पावलांकडे दुर्लक्ष करत आहेत. मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयांचे दूरगामी परिणाम होतील. फक्त एक-दोन तिमाहींवरुन कोणत्याही निष्कर्षांपर्यंत पोहोचणे योग्य होणार नाही,’ असे जयंत सिन्हा यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ या इंग्रजी वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखात म्हटले आहे.

‘अर्थव्यवस्थेसमोर असलेल्या आव्हानांवर अनेक लेख लिहिले गेले आहेत. मात्र हे लेख अपुरी माहिती आणि आकडेवारीच्या आधारे लिहिण्यात आले आहेत. अपुऱ्या माहितीच्या आधारे या लेखांमधून निष्कर्ष गाठण्यात आला आहे. या लेखांनी अर्थव्यवस्थेत झालेल्या मुलभूत बदलांकडे दुर्लक्ष केले आहे. एक किंवा दोन तिमाहींमधील सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या आकडेवारीपेक्षा दीर्घकालीन परिणाम विचारात घ्यायला हवेत,’ असे जयंत सिन्हा यांनी त्यांच्या लेखात म्हटले आहे.

नोटाबंदी, जीएसटीवरुन यशवंत सिन्हा यांनी पंतप्रधान मोदी आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर तोफ डागली होती. अर्थमंत्र्यांनी अर्थव्यवस्थाच ‘चौपट’ केली, असा हल्ला त्यांनी चढवला होता. या टीकेलाही जयंत सिन्हा यांनी उत्तर दिले. ‘अर्थव्यवस्थेच्या ढाच्यात बदल करुन नवा भारत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. यामुळे लोकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. नवी अर्थव्यवस्था पारदर्शक आणि जगासोबत चालणारी असेल. यामुळे लोकांचे जीवनमान उंचावेल. जीएसटी, नोटाबंदी आणि डिजिटल पेमेंटमुळे अर्थव्यवस्थेचा चेहरामोहरा बदलेल,’ असेही त्यांनी लेखात नमूद केले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत