म्हशीच्या पोटातून काढले ४० किलो प्लास्टिक

कणकवली : रायगड माझा वृत्त 

देवगड तालुक्‍यातील वाघोटन येथे म्हैशीच्या पोटातून 40 किलो प्लास्टिकसह न पचणारे अनेक घटक बाहेर काढण्यात आले. या संदर्भातील यशस्वी शस्त्रक्रिया पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. घोगरे यांनी केली. यामुळे या म्हैशीला जीवनदान मिळाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मनोज पुनाजी गुरव या शेतकऱ्याकडील म्हैस गेल्या महिन्यापासून अपचन व पोटफुगीच्या त्रासाने त्रस्त होती. या संदर्भात त्यांनी पशुवैद्यकिय अधिकारी डॉ. घोगरे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी म्हैशीची आरोग्य तपासणी केल्यानंतर म्हैशीच्या पोटात प्लास्टिक पिशव्या व न पचनारे घटक असल्याचा अंदाज व्यक्त केला. यामुळेच म्हैशीला वारंवार पोटफुगीचा त्रास होत असल्याचे सांगितले. त्याअनुषंगाने शस्त्रक्रिया करून म्हैशीच्या पोटातील अखाद्य वस्तू काढव्या लागतील असा सल्ला डाॅ. घोगरे यांनी दिला.

डॉ. घोगरे यांनी तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर या म्हैशीच्या पोटातून 40 किलो प्लास्टिक व अन्य न पचणारे घटक काढले व म्हैशीला जीवदान दिले. सरपंच कृष्णकांत आमलोसकर, यांच्यासह देवगड पशुसंवर्धन विभागातील डॉ. बागुल, डॉ. पी. के. गाडेकर, परिचर अशोक गवते यांनी शस्त्रक्रियेमध्ये डॉ. घोगरे यांना सहकार्य केले.

याबाबत बोलताना डॉ. घोगरे म्हणाले, जनावरांना मोकाट सोडल्याने जनावरे कोठेही काहीही खातात. कचराकुंड्यामध्ये प्लास्टिकच्या पिशवीत ठेवण्यात आलेला ओला कचरा खाण्याचा प्रयत्न जनावरे करतात. हे खाताना त्यांच्या पोटात हे प्लास्टिक जाते. प्लास्टिकचे विघटन होत नसल्याने ते तसेच पोटात साठून राहाते व याचा त्रास त्या जनावरांना होतो.

दुधातून कॅलरियन फॉस्फटर्स, विटामिन्स यासारखे घटक जनारांच्या शरीरातून कमी होतात. अशा जनावरांना अखाद्य वस्तू खाणे, भिंती चाटणे, दावे-दोर खाणे, मुत्र पिणे अशा सवयी जडतात. हे टाळण्याकरिता पशुपालकांनी गुरांना नियमित जंताचे औषध व जीवनसत्वे देणे गरजेचे असते.
– डॉ. घोगरे,
 पशुधन विकास अधिकारी

अशा घटना टाळण्यासाठी… 

  • पशुपालकांनी जनावरे मोकाट सोडू नयेत
  • खाद्य पदार्थ पिशव्यांमध्ये भरून टाकू नयेत
  • प्लास्टिक पिशव्यांची विल्हेवाट घरातच लावणे गरजेचे आहे.
  • पाळीव जनावरांना सकस आहार देण्यात यावा त्यामुळे जनावरे अशा वस्तू खाण्यास नाकारतील.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत