म्हसळा : नेवरुळ गावातील हनुमान मंदिराकडे जाणारा रस्ता खचला

म्हसळा : निकेश कोकचा 

म्हसळा तालुक्यात मागील काही वर्षांपासून विकास कामांची गंगा वाहत आहे हे जरी खरे असले तरी होत असलेली विकास कामे ही जनतेच्या फायद्यासाठी किती आणि ठेकेदारांच्या फायद्यासाठी किती होत आहेत हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. तर अनेक गावातून स्थानिक लोकप्रतिनिधी चिरीमिरी टक्केवारी घेण्यासाठी व ठेकेदार स्वतःचा जास्तीत जास्त नफा काढण्यासाठी आपल्या मर्जीनुसार कामाशी संबंधित इंजिनिअर यांना हाताशी धरून निकृष्ट दर्जाची कामे करीत असल्याची भीषण वस्तुस्थिती म्हसळा तालुक्यात मागील काही वर्षांपासून पहावयास मिळत आहे.
वर्षभरापूर्वी केलेली समाज मंदिरे, अंतर्गत रस्ते, अंगणवाडी इमारत अशी अनेक कामे आहेत की ती वर्षभरात कुठे भिंतीना तडा जाते, तर कुठे रस्ता उखडला आहे तर अनेक कामे ठेकेदारांनी पूर्णच केलेली नाहीत त्यामुळे म्हसल्यात वाहत असलेल्या “विकास गंगेचे पाणी नेमके कोण पितोय” आणि निकृष्ट दर्जाची व अपूर्ण अवस्थेतील कामे आणि ठेकेदारांना असलेले अभय यामुळे “विकासाच्या गंगेतील पाणी नेमके कुठे मुरतोय” हा देखील प्रश्न सर्व सामान्य नागरिकांना पडला आहे.
सध्या म्हसळा तालुक्यात होत असलेली निकृष्ट दर्जाची कामे याचे उत्तम उदाहरण म्हणजे नेवरुळ गावातील हनुमान मंदिराकडे जाणारा खचलेला रस्ता आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की नेवरुळ येथे तीन वर्षांपूर्वी जन सुविधा योजनेतून पाच लाख रुपये खर्च करून रस्ता बनविला होता हा रस्ता पुर्णपणे खचला असून याचा काही भाग वाहून गेला आहे. या रस्त्याचे काम समर्थ कृपा मजूर सह. सोसायटीच्या नावे पोट ठेकेदार लहूशेठ म्हात्रे यांनी घेतला होता.
अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम करून फसवणुक केली आहे याबाबत नेवरूळ चे सजग नागरिक यानी तक्रार केली म्हणून पहाणी करून रस्ता पून्हा सुस्थितीत करून देतो असे वचन इंजिनिअर श्री.आर आर.पवार यांनी दिले आहे अशी माहिती स्थानिक नागरिक तथा शिवसेना पक्षाचे क्षेत्र संघटक श्री.रविंद्र लाड यांनी प्रतिनिधींना दिली आहे.
● नेवरुळ येथील खचलेल्या रस्त्याची मी स्वतः पाहणी केली आहे या रस्त्याचे काम पुन्हा ठेकेदाराकडून चांगल्या व सुस्थितीत करून घेण्यात येईल. श्री.आर आर.पवार : इंजिनिअर पंचायत समिती म्हसळा
● नेवरुळ येथे तीन वर्षापूर्वी मी हे काम केले होते दोन वेळा या कामासाठी मी नव्याने खर्च केला होता आता या कामाची देखभाल व दुरुस्ती करण्याचे काम नेवरुळ ग्रामपंचायतिचे आहे त्यामुळे ग्रामपंचायत हा रस्ता दुरुस्ती करून घेईल.
श्री.लहुशेठ म्हात्रे :  पोट ठेकेदार म्हसळा
● अभियंता श्री आर.आर.पवार हे अनेक दिवसापासून तालुक्यात राजकारण करत आहेत. सदर रस्ता जर अशापद्धतीने उखडला असेल तर त्याची चौकशी झालीच पाहिजे, आणि पवार तसेच संबंधीत अधिकारी व त्यांना पाठीशी घालणारी राजकीय मंडळी यांची सुद्धा कसून चौकशी झाली पाहिजे. या चौकशीमध्ये जर का कसुरपणा दाखवला तर शिवसैनिक गप्प बसणार नाहीत. वेळ पडली तर जनआंदोलन उभे केले जाईल.
श्री.रविंद्र लाड : शिवसेना पक्ष क्षेत्र संघटक
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत