म्हाडा घरे होणार ३० टक्क्यांनी स्वस्त

मुंबई : रायगड माझा वृत्त

घरांच्या चढ्या किंमतीमुळे ढासळणारा नावलौकिक सावरण्यासाठी म्हाडाने पाऊल उचलले असून येत्या लॉटरीतील घरांच्या किंमती २५ ते ३० टक्क्यांनी कमी असतील, अशी घोषणा म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी शुक्रवारी केली. त्याचबरोबर विकासकांकडून म्हाडाला प्रीमियम म्हणून जो घरांचा साठा मिळतो त्यांच्या किंमतीतही लक्षणीय कपात होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना म्हाडाकडून एकप्रकारे दिवाळी भेटच मिळणार आहे.
म्हाडाच्या घरांच्या चढ्या किंमतीमुळे सर्वसामान्य लोकांमध्ये नाराजी पसरली आहे. अनेकांनी लॉटरीत घरे लागूनही केवळ घर महाग असल्याने ताबा घेतलेला नाही. त्यामुळे म्हाडावर टीकेचा भडिमार होत असतो. या टीकेची गंभीर दखल घेत नवनिर्वाचित अध्यक्ष उदय सामंत यांनी किंमती कमी करण्यासंदर्भात पुढाकार घेतला. अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर किंमती कशा कमी होतील याचा आराखडा तयार केला. त्यानंतर म्हाडाच्या घरांच्या किंमती २५ ते ३० टक्क्यांनी कमी करण्यास तत्त्वत: मान्यता देण्यात आली.
‘विविध वर्गवारीतील घरांच्या सुधारित किंमती नेमक्या किती असतील हे निश्चित होईल व त्यानंतर लॉटरीची तारीख जाहीर करू’, असे सामंत यांनी सांगितले.

अशी होणार कपात
उत्पन्न गट दर
उच्च रेडी रेकनर दराच्या ७० टक्के
मध्यम रेडी रेकनर दराच्या ६० टक्के
अल्प रेडी रेकनर दराच्या ५० टक्के
अत्यल्प रेडी रेकनर दराच्या ३० टक्के
(या कपातीनुसार, मागील लॉटरीत विक्री न झालेले लोअर परळ येथील उच्च उत्पन्न गटातील एक कोटी ४० लाख रुपये दराचे घर आता ९९ लाखांत उपलब्ध होईल. एकंदर म्हाडाच्या घरांची किंमत दोन ते पाच लाख रुपयांनी कमी होईल, अशी अपेक्षा आहे.)

व्याजदरात दिलासा
म्हाडाचे घर मिळाल्यानंतर विशिष्ट हप्त्यात रक्कम भरावी लागते. वेळेत हप्ते न भरल्यास २ टक्के व्याज आकारण्याची सूचना रिझर्व्ह बँकेने केली होती. मात्र सरसकट दोन टक्के व्याज न आकारता ०.५ टक्के, १ टक्का व दोन टक्के असे टप्प्याटप्प्याने व्याज आकारण्याचा निर्णय म्हाडाने घेतल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत