यापुढे एनटीएव्दारे राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा घेणार

केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांची घोषणा 

नवी दिल्ली : रायगड माझा

 ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ (एनटीए) या स्वायत्त संस्थेच्यावतीने संगणकाद्वारे नीटसह इतर परीक्षा देशभर घेण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी शास्त्री भवानात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ ही केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्याद्वारे गठित स्वायत्त संस्था आहे. ही संस्था यापुढे राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (नीट),  संयुक्त प्रवेश परीक्षा (जेईई) मुख्य परीक्षा, विद्यापीठ अनुदान आयोगाची नेट परीक्षा,सामान्य व्यवस्थापन प्रवेश परीक्षा (सी-मॅट),  पदवीधर फार्मसी योग्यता परीक्षा (जीपॅट) या राष्ट्रीय स्तराच्यावरील परीक्षा यापुढे ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ तर्फे संगणकाद्वारे घेण्यात येतील.  परीक्षांचे अभ्यासक्रम, भाषेचा विकल्प, अथवा शुल्कात कोणताही बदल करण्यात आलेला नाही, अशी माहिती श्री. जावडेकर यांनी दिली.

राष्ट्रीय परीक्षा एजन्सीच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या परीक्षा या वर्षातून दोन वेळा घेण्यात येतील. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेतली जाईल, अशी माहिती श्री. जावडेकर यांनी दिली. यासह दोन वेळा घेण्यात येणाऱ्या परीक्षेत बसणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळतील ते गुण ग्राह्य धरण्यात येतील, याने विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार नाही.

 

परीक्षांचे असे असेल वेळापत्रक

यावर्षी राष्ट्रीय परीक्षा एजन्सीच्यावतीने घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे अपेक्षित  वेळा पत्रक जाहीर करण्यात आलेले आहे.

युजीसी-नेट ही परीक्षा दिनांक 2 आणि दि. 16 डिसेंबर 2018 ला दोन सत्रात होणे अपेक्षित आहे. या परीक्षेचे ऑनलाईन अर्ज भरण्याची कालावधी  हा दि. 1 ते 30  सप्टेंबर 2018 असणार आहे. या परीक्षेचा निकाल  जानेवारी 2019 च्या शेवटच्या आठवड्यात लागू शकेल.

जेईईची मुख्य परीक्षेला बसण्यासाठी ऑनलाईन अर्ज दि. 1 ते 30 सप्टेंबर 2018 दरम्यान भरता येणार असून  ही परीक्षा दिनांक 6 ते 20 जानेवारी 2019  च्या दरम्यान 8 वेळा  होणार असून उमेदवार कोणत्याही एका तारखेला परिक्षेस बसू शकतील. या परीक्षेचा निकाल फेब्रुवारी  2019 च्या पहिल्या आठवड्यात लागू शकेल.

जेईईची-मुख्य परीक्षा दुसऱ्यांदा 7 ते 21  एप्रिल 2019 दरम्यान 8 वेळा होणार असून उमेदवार या परीक्षेलाही कोणत्याही एका तारखेला बसू शकतील. या परीक्षेला बसण्यासाठी फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात ऑनलाईन अर्ज भरता येतील. या परीक्षेचा निकाल  मे 2019  च्या पहिल्या आठवड्यात लागू शकेल.

राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षा ही पुढील वर्षी फेब्रुवारी आणि मे 2019 मध्ये होणार आहे.  फेब्रुवारी 2019 मध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी दिनांक 1 ते  31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येतील. दि. 3 ते 17 फेब्रुवारी 2019 च्या दरम्यान 8 वेळा होणार असून विद्यार्थी  कोणत्याही एका तारखेला परीक्षा देऊ शकतील. या परीक्षेचा निकाल मार्चच्या 2019 मध्ये लागू शकेल.

राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षा दुसऱ्यांदा  दि. 12 ते 26 मे  2019 दरम्यान होणार असून यासाठी मार्च 2019 च्या दुसऱ्या आठवड्यात ऑनलाईन अर्ज भरता येणार. या परीक्षेचा निकाल  जुन 2019 च्या पहिल्या आठवड्यात लागणे अपेक्षित आहे.

            सीमॅट आणि जीपॅट  ही परीक्षा  जानेवारी 2019 मध्ये होणे अपेक्षित असून  दिनांक 22 ऑक्टोबर ते 15 डिसेंबर 2018पर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येऊ शकतील. या परीक्षा दिनांक 27 जानेवारी 2019 ला होऊ शकतात. तर या परीक्षांचे निकाल फेब्रुवारी 2019 च्या पहिल्या आठवड्यात  लागणे अपेक्षित आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत