यापुढे निवडणूक लढविणार नाही : चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : रायगड माझा वृत्त 

मला कुठलीही निवडणूक यापुढे लढवायची नाही. लोकसभा किंवा विधानसभा लढवणार नाहीच, मी पदवीधर मतदार संघासाठीही इच्छुक नाही, असे वक्‍तव्य पालकमंत्री चंद्रकात पाटील यांनी गुरुवारी केले. गुरुवारी पोलिस दलाच्या गणराया अ‍ॅवॉर्ड वितरण सोहळ्यात ते बोलत होते.

केशवराव भोसले नाट्यगृहात गणराया अ‍ॅवॉर्ड वितरण सोहळ्यात आ. राजेश क्षीरसागर व पालकमंत्री चंद्रकात पाटील यांच्यात टोलेबाजी चांगलीच रंगली. डॉल्बीमुक्‍त गणेशोत्सवाबाबत कार्यकर्त्यांच्या भावना व्यक्‍त करताना आ. क्षीरसागर म्हणाले, गतवर्षी गणेशोत्सवामध्ये पोलिसांनी सूडभावनेतून माझ्या खासगी सचिवावर गुन्हा दाखल केला. डॉल्बीमुक्‍तीच्या नावाखाली प्रशासनाने कोणाच्या सांगण्यावरून दबावतंत्राचा वापर केला, याच्या खोलापर्यंत मी पोहोचलो आहे. मी लोकांमधून निवडून आल्याने त्यांच्या भावना मांडण्याचे काम करतो.

उत्सव हा उत्साहात होण्यासाठी प्रशासनाने साऊंड सिस्टीमला परवानगी द्यावी व संघर्ष टाळावा. 

याला उत्तर देताना विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी, कोणतीही कारवाई सूडभावनेतून करण्यात आली नसल्याचे स्पष्टीकरण दिले. तसेच काही गैरसमज झाले असतील, तर ते चर्चेतून सोडविण्याचेही आश्‍वासन दिले.

मला निवडणूक लढवायची नाही

आ. राजेश क्षीरसागर यांच्या जनतेतून निवडून येण्याच्या वक्‍तव्याचा समाचार घेत चंद्रकांत पाटील म्हणाले, मला काही जनतेतून निवडून यायचे नाही. मी भविष्यात लोकसभा किंवा विधानसभा लढवणार नाही आहे. पदवीधर मतदार संघातूनही यापुढे न लढण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

सभागृहात बसलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आर. के. पोवार यांनी, ‘दादा हे काय बोलताय’, अशी विचारणा केली. यावर चंद्रकात पाटील म्हणाले, ‘खरंच सांगतोय. मी यापुढे कोणतीही निवडणूक लढवणार नाही. तुमच्यापैकी कोणी इच्छुक असेल, तर सांगा’, या वक्‍तव्यानंतर सभागृहात एकच हास्यकल्‍लोळ झाला.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत