…या कारणामुळे माथेरानमध्ये पोलिसांनाच जीव मुठीत धरून राहावे लागणार!

गळके छप्पर आणि मोडकळीस आलेली माथेरान पोलिसांची घरे

माथेरान : श्वेता शिंदे

माथेरान  पोलीस वसाहतीमध्ये राहणाऱ्या पोलिसांच्या घरांची  पूर्ण पडझड झाली आहे. मान्सूनपूर्व पावसाने तर त्याचे भयाण वास्तव समोर आणले आहे. गळके छप्पर आणि मोडकळीस आलेली घरे यामुळे पोलिसांना आणि त्यांच्या कुटुंबियांना जीव  मुठीत धरून रहावे  लागत आहे. 

१९२५ साली माथेरानमधील ही पोलिस वसाहत बांधली गेली. माथेरानमध्ये येणारा प्रत्येक पोलीस हा पोलीस ठाण्याला लागून असलेल्या पोलिस कॉलनीमध्ये राहत आहे. या कॉलनीचे बांधकाम ९५ वर्षे जुने आहे. इतके वर्षे होऊनही या कॉलनीची पुनर्बांधणी तर सोडाच पण पोलिस प्रशासनाने आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने डागडुजीही केली नाही.  या घरांच्या भिंती ठिसूळ झाल्या आहेत, छपरावर सिमेंटचे पत्रे असल्याने माकडांनी चालून ते तुटलेल्या अवस्थेत आहेत. दोन  दिवसापुर्वी झालेल्या पावसामध्ये या घरांची पूर्ण वाताहत झाली आहे. अनेक वेळा माथेरान या मधील पोलीस कॉलनीच्या दुरुस्तीचा प्रस्ताव तयार करण्यात आला, पण प्रत्यक्षात काहीही झालेले नाही.

याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता आम्ही या कॉलनीच्या कामाची पाहणी करून  मोजणी  केली आहे. या कामाचा  अंदाजित खर्चाचा अहवाल रायगड पोलीस अधीक्षक यांच्याकडे पाठवला आहे. परंतु अधीक्षक कार्यालयाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेपर्यंत आम्ही काहीही करू शकत नाही असे सांगण्यात आले. माथेरान पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक महादेव आचरेकर यांच्या म्हणण्यानुसार वरिष्ठ अधिकारी याबाबत सकारात्मक आहेत. आणि कॉलनीच्या पुनर्बांधणीसाठी नियोजित निधी लवकरच मिळून आमच्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी एक सुसज्ज कॉलनी होईल.

मात्र पोलिसांची व्यथा वेगळीच :

पुढील ४ महिने येणारा पाऊस आम्ही कसा झेलणार, आमच्या लहान मुलांना पाण्यामध्ये राहावं लागणार आहे. या भीतीच्या सावटाखाली आहेत. आमच्या पगारातून घरभाड्याची कपात केली जाते. मग आम्हाला उघड्यावर का ठेवता असाही पोलिसांचा सवाल आहे. माथेरानमध्ये पाऊस जास्त प्रमाणात पडतो यासाठी पावसाळी पुढील चार महिन्यांसाठी तात्पुरती छपराची डागडुजी करावी अशी मागणीही पोलिसांकडून केली जात आहे.

 

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत