युतीसाठी अमित शहा लवकरच ‘मातोश्री’च्या दारी

मुंबई : रायगड माझा वृत्त 

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी शिवसेना-भाजप यांच्या युतीवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती भाजपच्या गोटातून मिळाली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना 23, तर भाजप 25 जागांवर लढणार असून, विधानसभेसाठी 50-50 टक्‍क्‍यांच्या फॉर्म्युल्यावर दोन्ही पक्षांचे एकमत झाल्याचे सांगण्यात आले. या पार्श्‍वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा लवकरच “मातोश्री’वर येणार आहेत. 

संग्रहित छायाचित्र

गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने 22 जागा लढविल्या होत्या. मात्र पालघर लोकसभा पोटनिवडणुकीपासून शिवसेनेने या जागेची मागणी केल्याने भाजपने पालघरच्या जागेवरही पाणी सोडल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. याशिवाय विधानसभेच्या जागावाटपावरही बोलणी झाल्याचे समजते. विधानसभेसाठी शिवसेनेची 50-50 च्या फॉर्म्युलाची मागणीही मान्य झाल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार शिवसेना-भाजप विधानसभेची निवडणूक प्रत्येकी 144-144 जागांवर लढणार आहेत. येत्या दोन-तीन दिवसांत भाजप अध्यक्ष अमित शाह “मातोश्री’वर येऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे बोलले जाते.

भेटीनंतर शिक्कामोर्तब? 
गेल्या काही दिवसांपासून शिवसेना-भाजपमध्ये युती होणार की नाही, यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. भाजप युतीसाठी आग्रही आहे. मात्र शिवसेनेने गेल्या काही महिन्यांपासून आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपवर टीका करण्याची एकही संधी शिवसेनेच्या नेत्यांनी सोडली नाही. युतीबाबत विचारणा केली असता उद्धव ठाकरेंपासून सर्वच शिवसेना नेत्यांनी आगामी निवडणुकीबाबत स्वबळाचा नारा दिला. मात्र भाजप नेत्यांनीही युती होणार असा विश्‍वास वारंवार व्यक्त केला होता. त्यामुळे येत्या काही दिवसांत युतीची घोषणा झाली, तर या युतीबाबतच्या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळेल. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यापासून युतीवर शिक्‍कामोर्तब झाल्याचे मानण्यात येते.

ही आहे शक्‍यता 
लोकसभेसाठी 
भाजप : 25
शिवसेना : 23

विधानसभेसाठी 
भाजप : 144
शिवसेना : 144

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत