युतीसाठी भाजप सकारात्मक


मुंबई : रायगड माझा वृत्त

बदललेल्या राजकीय परिस्थितीत शिवसेनेकडून खूपच ताठर भूमिका घेतली जात आहे. शिवसेनेने युती करण्यासाठी बोलणी सुरू केल्यास भाजपकडून त्यांच्या प्रस्तावावर सकारात्मक प्रतिसाद देण्याची तयारी आहे. विधानसभेच्या काही जास्त जागा देण्याचीही भाजपच्या नेतृत्वाकडून तयारी आहे. जानेवारी अखेरपर्यंत वाट बघू. कारण लोकसभा निवडणुकीची आचारसंहितेची लागू होण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. त्यामुळे जानेवारीनंतर निर्णय घ्यावा लागेल, अशी रणनीती भाजपने ठरविली आहे.

सन २००९च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने ११९ जागा लढविल्या होत्या. त्यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये भाजप ११७ आणि शिवसेना १७१ असे जागांचे वाटप होत असे. नऊ आकडा युतीला लाभदायक असल्याने असे आकडे ठरले होते. २०१४च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने आणखी दहा-बारा जागा जास्त मागितल्या. शिवसेनेने याआधी एकदाही न जिंकलेल्या अशा ३५ जागा होत्या. त्यातील दहा किंवा बारा जागा द्या, अशी भाजपची मागणी होती. परंतु त्या जागा देण्यास शिवसेनेच्या नेतृत्वाने नकार दिला आणि युती तुटली. त्या जागा भाजपला दिल्या असत्या तर आज शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असता. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेनेसोबत युती करण्यात कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या टीकेला प्रत्युत्तर देऊ नका, असा सबुरीचा सल्ला भाजपच्या नेत्यांना दिला आहे. तसेच शिवसेनेच्या नेतृत्वाशी संपर्क साधण्याचाही सातत्याने प्रयत्न केला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत