येत्या १ फेब्रुवारीपासून मिळणार १०% आरक्षणाचा लाभ

नवी दिल्ली : रायगड माझा वृत्त  

येत्या १ फेब्रुवारीपासून देशभरातील गरिब सवर्णांना केंद्र सरकारच्या शासकीय नोकऱ्यांमध्ये १० टक्के आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे. १ फेब्रुवारी किंवा त्यानंतर जारी केल्या जाणाऱ्या नियुक्ती प्रक्रियेच्या अधिसूचनेद्वारे उपलब्ध होणाऱ्या सर्व नोकऱ्यांमध्ये हे १० टक्के आरक्षण लागू होणार आहे. या संदर्भात केंद्र सरकारच्या कार्मिक विभागानं एक आदेश जारी करत आरक्षणाचा लाभ मिळण्याच्या दृष्टीने आवश्यक ते नियम अधोरेखित केले आहेत.

गरिब सवर्णांपैकी ज्या लोकांनी कधीही कोणत्याही आरक्षणाचा लाभ घेतलेला नसेल, आणि ज्यांचे कौटुंबिक उत्पन्न ८ लाखांहून कमी आहे, असे सर्व गरिब सवर्ण आरक्षणासाठी पात्र असणार आहेत.

‘हे’ धरले जाणार कुटंबाचे सदस्य

विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार, आरक्षणासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीसोबत त्याचे आई-वडील, १८ वर्षांहून कमी वयाचे त्याचे भाऊ-बहीण आणि अल्पवयीन मुलांना कुटुंबाचे सदस्य म्हणून मान्यता असेल. या व्यतिरिक्त, आरक्षणाच्या अर्हतेच्या तपासणीदरम्यान एकूण कौटुंबिक उत्पन्नाच्या सर्व स्त्रोतांची पडताळणी करण्यात येईल. यात शेती, नोकरी, व्यापार आणि इतर स्त्रोतांमधून मिळणारे एकूण उत्पन्न मोजले जाणार आहे. हे उत्पन्न ८ लाखांहून कमी भरल्यास अर्जदाराला आरक्षणाचा लाभ घेता येईल.

५ एकराहून कमी जमीन असल्यास लाभ

मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या प्रस्तावानुसार, ज्या कुटुंबाकडे ५ एकर किंवा त्यापेक्षा अधिक शेती करण्याजोगी जमीन किंवा १ हजार चौरस फूट किंवा त्याहून अधिक क्षेत्रफळाचे घर असेल, तर अशा कुटुंबाला आरक्षणाचा लाभ मिळणार नाही. याबरोबरच ज्या लोकांकडे स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे अधिसूचित न केलेली ६०० फूटाहून अधिक जमीन असेल, किंवा ज्यांच्याकडे ३०० फूट किंवा त्याहून अधिक अधिसूचित जमीन असेल, असे लोकही आरक्षणाचा लाभ घेऊ शकणार नाहीत.

सक्षम अधिकाऱ्याकडून घ्यावे लागणार प्रमाणपत्र

विभागीय जाहिरातीनुसार, आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी संबंधित अर्जदार कुटुंबाला तहसीलदार किंवा तहसीलदाराहून वरिष्ठ सक्षम अधिकाऱ्याकडून आपले उत्पन्न आणि संपत्तीचे प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे. हे प्रमाणपत्र मिळवणारे, आणि इतर सर्व नियमांमध्ये बसणारे सर्व लोक १ फेब्रुवारी २०१९ किंवा त्यानंतर उपलब्ध होणाऱ्या केंद्र सरकारच्या सर्व नोकऱ्यांमध्ये आरक्षणाचा लाभ घेऊ शकतील.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत