रत्नागिरी : इनोव्हा गाडी नदीत कोसळून तिघे बेपत्ता

रत्नागिरी : रायगड माझा वृत्त

गाडीचा टायर फुटून इनोव्हा गाडी असावी नदीत कोसळल्याची घटना आज सकाळी १० च्या सुमारास घडली. या भीषण घटनेत चालकाला वाचविण्यात यश आले असून अन्य तिघे बेपत्ता आहेत.

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वरजवळच्या धामणी येथे हा अपघात घडला. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार राजापूर कडून पनवेलकडे जाणारी रिकामी गाडी लांजा येथे आली. तिथे चार प्रवासी खेडला जाण्यासाठी इनोव्हा मधे बसले. यात दोन महिला एक १२ वर्षीय मुलगा आणि एका पुरुषाचा समावेश होता. गाडी संगमेश्वरजवळ धामणी येथे आली असता टायर फुटल्याने भरधाव गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटले. ही गाडी विरूध्द दिशेला जावून असावी नदीत कोसळली. काही वेळातच चालकाने दरवाजा उघडून बाहेर पडण्याचा यशस्वी प्रयत्न केला. त्यानंतर त्याने गाडीतील मुलाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे त्याला शक्य झाले नाही. अखेर नदीतील झाडाचा आधार घेत त्याने आरडाओरडा केला. स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत त्याला बाहेर काढले. मात्र इनोव्हा गाडी वाहून गेली आहे. यामुळे इतर तिघे बेपत्ता असून ग्रामस्थ त्यांचा शोध घेत आहेत.

घटनास्थळी पोलीस, आपत्ती व्यवस्थापन समिती आणि राजु काकडे हेल्प ॲकॅडमीचे कार्यकर्ते आणि शेकडो ग्रामस्थ इनोव्हा गाडीचा शोध घेत आहेत. इनोव्हा क्रमांक एम एच ०६ ए डब्ल्यू ७७७९ असा असून चालकाचे नांव नितीन लक्ष्मण वाघमारे असे आहे. तर मृतांमध्ये प्रगती पाटणे ४०, चिटू पाटणे १२, प्रभावती बेर्डे ६० यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत