रमाकांत आचरेकर यांच्या निधनाने क्रिकेटविश्वावर शोककळा

मुंबई : रायगड माझा वृत्त 

विश्वविक्रमादित्य सचिन तेंडुलकरसह अनेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय दर्जाचे नामवंत क्रिकेटपटू घडविणारी ‘फॅक्टरी’ असलेले ‘गुरू द्रोणाचार्य’ रमाकांत आचरेकर (87 वर्षे) यांचे बुधवारी मुंबईतील दादर येथील निवासस्थानी वृद्धपकाळाने निधन झाले. क्रिकेटचे महागुरू भीष्माचार्य हरपल्याने क्रिकेट जगतावर शोककळा पसरली. सोशल मीडियावर क्रिकेट जगतातील आजी-माजी खेळाडूंसह विविध क्षेत्रांतील मान्यवर व्यक्तींनी आचरेकर सरांना आपल्या भावना व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली. आज सकाळी दहा वाजता शिवाजी पार्क येथून त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे.

माझे गॉडफादरच – प्रवीण आमरे
वयाच्या दहाव्या वर्षापासून मी सरांच्या सान्निध्यात होतो. माझ्या कारकिर्दीच्या प्रत्येक टप्प्यात त्यांचा आशीर्वाद माझ्या डोक्यावर होता. खडतर प्रवासातही ते माझ्यामागे खंबीरपणे उभे राहिले. वयाच्या 18व्या वर्षी त्यांनी मुंबई सोडून इतर संघाकडून खेळायला सांगितले. मी रेल्वे संघातून खेळलो आणि त्यानंतर मला हिंदुस्थानी संघाचे तिकीट बुक करता आले. माझ्यासाठी ते गॉडफादरच होते. आता त्यांच्या प्रेरणेतून युवा खेळाडूंना घडवण्याचे काम सुरूच ठेवण्याचा प्रयत्न करीन.

…आणि माझे जीवन बदलले – चंद्रकांत पंडित
मी शिक्षण पूर्ण करून नोकरी करावी, असे वडिलांना वाटत होते. पण माझ्यातील क्रिकेटमधील गुणवत्ता पाहून आचरेकर सरांनी वडिलांची भेट घेतली. 1978 सालची ही गोष्ट. त्या वेळी त्यांनी वडिलांना एक हजार रुपये दिले आणि सांगितले की, असे समजा तुमचा मुलगा नोकरी करतोय. यानंतर माझ्या वडिलांनी क्रिकेट खेळण्याची परवानगी दिली. तेथूनच माझे जीवन बदलले. आणखी एक महत्त्वाची घटना मी विसरू शकत नाही. जेव्हा मी 19 वर्षांखालील मुंबई संघाचा प्रशिक्षक झालो, तेव्हा सरांचे आशीर्वाद घेण्यासाठी त्यांच्याकडे गेलो असता ते म्हणाले, माझ्यानंतर तूच प्रशिक्षक म्हणून यशस्वी होऊ शकतोस.

त्यांच्यामुळेच घडलो – लालचंद राजपूत
शालेय क्रिकेट खेळलो नाही. ते मग हॅरीस शिल्ड असो किंवा गाईल्स शिल्ड. कोणत्याही प्रकारचे शालेय क्रिकेट न खेळता मला इथपर्यंत मजल मारता आलीय ती आचरेकर सरांमुळेच. त्यांच्या मोलाचा मार्गदर्शनामुळेच मी घडलो. आचरेकर सरांनी उन्हाळी प्रशिक्षण शिबिरात खेळताना पाहिले. तिथेच त्यांनी माझी निवड केली. त्यानंतर रुईया कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायला सांगितले. कमी पैशांमध्ये तिथे प्रवेश घेतला तोही त्यांच्यामुळेच. याच दरम्यान आचरेकर सरांच्या ससानियन या क्लबमधूनही खेळलो. कसून सराव करून ते घेत असत. त्यांची शिस्त कडक असायची. लागोपाठ 10 सामने आम्हाला खेळायला लागायचे. सामन्यांनंतर आमच्या खेळातील चुकाही ते सांगायचे.

त्यांच्यासारखा प्रशिक्षक होणे नाही – दिनेश लाड
दिग्गज क्रिकेटपटूंचे गुरू म्हणून ओळख असणारे रमाकांत आचरेकर यांच्या निधनाची बातमी समजताच अतीव दुःख झाले. एकामागोमाग एक असे आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार करणे ही साधी बाब नाहीए. गरीब युवा खेळाडूंसाठी ते देव होते. त्यांच्यामधील गुणवत्ता हेरून ते त्यांना मार्गदर्शन करायचे. येथे पैशांचा काडीमात्र संबंध नसायचा. असा प्रशिक्षक पुन्हा होणे नाही.

खेळाडूंना माणूस म्हणूनही घडवले – बीसीसीआय
बीसीसीआयने रमाकांत आचरेकरांच्या निधनाबद्दल ट्विटवरवरून शोक व्यक्त केला. रमाकांत आचरेकरांनी केवळ उत्तम क्रिकेटपटूच तयार केले नाहीत तर त्यांना माणूस म्हणूनही घडवले, अशा शब्दांत बीसीसीआयने आदरांजली वाहिली.

एक श्रेष्ठ प्रशिक्षक हरपला – मुख्यमंत्री
ज्येष्ठ क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या निधनाने हिंदुस्थानी क्रिकेट क्षेत्राला उत्तमोत्तम खेळाडूंची देणगी देणारा एक श्रेष्ठ प्रशिक्षक हरपला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. ‘पद्मश्री’ आणि ‘द्रोणाचार्य’ पुरस्काराने गौरवान्वित झालेल्या आचरेकर सरांचे क्रिकेट प्रशिक्षणातील योगदान असामान्य आहे. सचिन तेंडुलकर यांच्यासारख्या महान खेळाडूसोबत चंद्रकांत पंडीत, विनोद कांबळी, अजित आगरकर, प्रवीण आमरे आदी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंना घडविण्यात आचरेकर सरांनी मोलाची भूमिका बजावली. त्यांनी घडविलेल्या अनेक खेळाडूंनी उत्तम प्रशिक्षक म्हणूनही कारकीर्द घडविली आहे. पुस्तकी तंत्रापेक्षा खेळाडूच्या नैसर्गिक गुणांना पैलू पाडण्याचे त्यांचे तंत्र विशेष होते, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत