रमेश कराड यांना राष्ट्रवादीने फोडताच पंकजा मुंडेंनी बाहेर काढले ‘मराठा कार्ड’!

बीड : रायगड माझा

लातूर- बीड- उस्मानाबाद- लातूर स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या विधान परिषदेच्या होणा-या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून रमेश कराड यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर तासाभरातच रमेश कराड यांनी लातूर येथे अर्ज दाखल केला. दरम्यान, पंकजा मुंडे यांनीही राष्ट्रवादीला तोडीस तोड उमेदवार देताना भाजपाकडून माजी मंत्री सुरेश धस यांची उमेदवारी निश्चित केली आहे. सुरेश धस बुधवारी ( 3 मे) आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

रमेश कराड यांनी एका रात्रीत भाजपमधून राष्ट्रवादीत आणण्याची किमया विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. आज सकाळी रमेश कराड यांनी धनंजय मुंडे, आमदार राणा पाटील, आमदार सतीश चव्हाण, आमदार अमरसिंह पंडित, बाबासाहेब पाटील, माजी आमदार पृथ्वीराज साठे, जीवनराव गोरे, आमदार राहुल मोटे, बसवराज पाटील नागराळकर यांच्या उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर तासाभरात त्यांनी विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीकडून अर्ज दाखल केला. दरम्यान, कराड यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला असली तरी काँग्रेसचे कोणीही नेते यावेळी उपस्थित नव्हते.

सुरेश धसांच्या रूपाने पंकजा मुंडेंचे मराठा कार्ड-

राष्ट्रवादीने रमेश कराड रातोरात भाजपमधून फोडले असले तरी पंकजा मुंडे यांनीही राष्ट्रवादीला चकवा देण्यासाठी सुरेश धसच्या रूपाने मराठा कार्ड पुढे केले आहे. बीड जिल्हा परिषदेची सत्ता ताब्यात घेण्यासाठी सुरेश धस यांनी पंकजा मुंडे यांना मदत केली होती. त्याची परतफेड म्हणून पंकजा यांनी धस यांनी उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. धस यांनी अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केलेला नसला तरी बुधवारी ते पंकजा मुंडे, संभाजी निलंगेकर यांच्या उपस्थितीत आपला अर्ज दाखल करणार आहे. राष्ट्रवादीने काँग्रेसला विश्वासात न घेता कराड यांचा अर्ज दाखल केल्याने काँग्रेसमधील काही नाराज मंडळी मराठा कार्डच्या नावाखाली धस यांना मदत करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.