रायगड माझा ऑनलाईन
बॉलिवूड अभिनेत्री म्हटले की आलिशान कारमधून प्रवास करणे हे ओघाने आलेच. परंतु रविना टंडनने आठवड्याची सुरुवात रिक्षातून प्रवास करण्यापासून केली. परंतु रिक्षातला हा तिचा प्रवास तिच्यासाठी एक वेगळाच अनुभव ठरला असे दिसते आहे.
अभिनेत्री रविना टंडनला मुंबईमध्ये माणुसकी शिल्लक आहे हे दाखवणारा एक अनुभव मिळाला. रविना टंडनने मुंबईत कामानिमित्त फिरण्यासाठी स्वतःच्या गाडीला आराम दिला आणि रिक्षाने प्रवास करायचे ठरवले. या प्रवासात तिची मैत्रीण पूर्णिमा लांच्छन तिच्यासोबत होती. दोन घनिष्ठ मैत्रिणी जशा भेटल्या भेटल्या गप्पांमध्ये रमतात अगदी तशाच या दोघी देखील गप्पांमध्ये रमल्या. अशा गप्पा करत करतच ठरलेल्या ठिकाणी उतरल्या. परंतु गप्पांच्या ओघात मात्र त्या दोघी फोन रिक्षातच विसरून गेल्या. त्यांच्या लक्षातही आले नाही की त्यांनी फोन रिक्षातच ठेवला. परंतु रिक्षावाला तो फोन घेऊन त्यांच्या मागे आला आणि त्यांच्या हाती त्यांचा फोन सुपूर्त केला.
रिक्षावाल्याचा प्रामाणिकपणा जगासमोर आणण्यासाठी रविनाने कोणतीही कसर सोडली नाही. हा संपूर्ण अनुभव तिने सोशल मीडियावर शेअर केला. त्या रिक्षावाल्यासोबत फोटो काढून, अगदी त्याच्या रिक्षाच्या नंबर प्लेटचा ही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला त्याच्या प्रामाणिकपणाचे कौतुकही केले. फोटो पाहून असे दिसतेय की कदाचित रविनाने त्याला त्याच्या प्रामाणिकपणाबद्दल बक्षीसही दिले. त्याच्या हातात दोन हजाराची कोरी नोट पाहायला मिळतेय. रिक्षावाल्याने देखील हे बक्षीस स्वीकारले.
रविनाबाबत आणखी एक महत्वाची बातमी ऐकायला मिळाली आहे. आपल्या बिझी शेड्युलमध्ये रविना काही सामाजिक कामही करत असते. तिला प्राणी हक्कांच्या संघटनेबरोबर काम करायला आवडते. तिने “एथिकल ट्रीटमेंट फॉर ऍनिमल’साठी कामही केले आहे. मुंबईत तिच्या बंगल्याच्या आवारात एक घुबड कावळ्यांनी हल्ल्यानंतर झाडावरून पडल्याने जखमी झालेले होते. ते बघितल्यावर रविनाने या घुबडाला स्वतः उचलून त्याच्या जखमांवर औषधपाणी केले. या घुबडाला जीवदान देण्यातही तिचा पुढाकार होता ते निखळ प्रेमापोटीच.