रविवारी मध्य रेल्वेवर गर्दी उसळणार,140 लोकल फेऱ्या रद्द

मुंबई : रायगड माझा वृत्त 

मध्य रेल्वेच्या कल्याणजवळील 104 वर्षे जुना पत्री उड्डाणपूल पाडण्यासाठी रेल्वे प्रशासनाने पॉवर ब्लॉक घेण्याची तयारी चालविली असून त्यामुळे लोकलच्या 140 फेऱया रद्द होण्याची शक्यता आहे, तर लांब पल्ल्याच्या 43 गाडय़ांचे वेळापत्रक विस्कळीत होणार आहे. रेल्वे बोर्डाची मंजुरी मिळताच येत्या रविवारी सहा तासांचा हा ब्लॉक घेण्याची सज्जता मध्य रेल्वेने ठेवली आहे.

पश्चिम रेल्वेच्या अंधेरी येथील गोखले पुलाचा पादचारी भाग 3 जुलै रोजी कोसळल्याच्या घटनेनंतर रेल्वेने सर्वच पुलांचे आयआयटी तज्ञांच्या मदतीने सुरक्षा ऑडिट केले होते. त्यात कल्याणचा पत्री पूल धोकादायक ठरविण्यात आला होता. त्यानंतर या पुलावरील अवजड वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. त्यासाठी पुलावर ‘हाईट गेज’च्या कमानी बसविण्यात आल्या होत्या. त्यानंतर 18 ऑगस्टपासून पूल पाडण्याची कारवाई सुरू झाल्याने छोटय़ा वाहनांची वाहतूकही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

एमएसआरडीसी बांधणार दोन पदरी पूल
पत्री पूल पाडताना एमएसईबीच्या केबल, पाईपलाइन, ऑप्टिकल फायबर केबलदेखील हटविण्यात येणार आहेत. हा पूल पाडल्यानंतर राज्य रस्ते विकास महामंडळ या जागी दोन पदरी नवा पूल बांधण्याचे काम सुरू करणार असून त्याचे कंत्राट यापूर्वीच देण्यात आले आहे.

डोंबिवली ते कल्याण लोकल बंद
या ब्लॉकदरम्यान कल्याण ते डोंबिवलीपर्यंतची लोकल सेवा संपूर्णपणे बंद करण्यात येणार आहे, तर सीएसएमटी ते डोंबिवली आणि कल्याण ते कर्जत-कसारा येथे लोकल चालविण्यात येतील, परंतु फेऱयांची संख्या कमी असणार आहे. लांब पल्ल्याच्या 43 ट्रेन एक तर रद्द होतील किंवा अन्यत्र वळविण्यात अथवा नियंत्रित करण्यात येतील.

– मध्य रेल्वेने 18 नोव्हेंबर रोजी रविवारी रेल्वे ट्रकवरील पुलाचा ढाचा पाडण्यासाठी सहा तासांच्या ब्लॉकची योजना आखली आहे. त्यापूर्वी येथील ओव्हरहेड वायर्स काढाव्या लागणार असून पूल पाडल्यानंतर पुन्हा त्या जागच्या जागी बसवाव्या लागणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या सूत्रांनी दिली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत