रहदारीला अडथळा निर्माण केल्याप्रकरणी अभिनेता संतोष जुवेकरवर गुन्हा दाखल

पुणे : रायगड माझा वृत्त 

भररस्त्यात दहीहंडीचं आयोजन करून रहदारीला अडथळा निर्माण केल्याप्रकरणी अभिनेता संतोष जुवेकर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे संतोषच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पुण्यातील सहकार नगरातील अरण्येश्वर चौकात या दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. अरण्येश्वर दहीहंडी उत्सव मंडळाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला अभिनेता संतोष जुवेकर प्रमुख पाहुणा म्हणून आला होता. पंचवीस बाय वीस लांब रस्त्यात ही दहीहंडी उभारण्यात आली होती. त्यामुळे संपूर्ण रस्ता अडवला गेला. परिणामी या परिसरात वाहतुकीची कोंडी झाली होती. त्याचा प्रवाशांना मोठा फटका बसला होता. या शिवाय या दहीहंडीवेळी प्रमाणापेक्षा मोठ्या आवाजात डॉल्बी लावण्यात आला होता. त्यामुळे ध्वनीप्रदूषण झालं होतं. पोलिसांनीही याची दखल घेत आयोजकांना कार्यक्रम बंद करण्यास सांगितलं होतं. परंतु दहीहंडीच्या आयोजकांनी त्याला विरोध करून शासकीय कामात अडथळा आणल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे सहकार नगर पोलिसांनी संतोष जुवेकरसह चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

दहीहंडीला गेलोच नव्हतो: संतोष

दरम्यान, दहीहंडीच्या दिवशी आपण पुण्याला गेलोच नव्हतो, असं संतोष जुवेकरने स्पष्ट केलं आहे. या मंडळाकडून मला आमंत्रणही देण्यात आलं नव्हतं. त्या दिवशी मी दिवसभर ठाण्यातील माझ्या घरी होतो. मंडळाने परवानगीशिवाय बॅनरवर माझा फोटो वापरला. त्यामुळे हा फोटो पाहून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल करण्यापूर्वी पोलिसांनी किमान शहानिशा तरी करायला हवी होती, असं संतोषनं म्हटलं आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत