राजकीय दबावातून अतिक्रमण कारवाई?

ज्येष्ठाचे क्रेनखाली लोटांगण : सलग दुसऱ्या दिवशी तणाव

पिंपरी : रायगड माझा 

महापालिकेच्या वतीने अतिक्रमण विरोधी पथकाने सलग दुसऱ्या दिवशी (दि.4) संत तुकारामनगर येथील टपऱ्यांवर कारवाई करण्यात आली. ही कारवाई राजकीय दबावातून केली जात असल्याचा आरोप टपरी, पथारी, हातगाडी पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे यांनी केला. या कारवाई दरम्यान संघटनेच्या एका कार्यकर्त्याने थेट क्रेनखाली लोटांगण घालत या कारवाईला विरोध केला.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने संत तुकाराम नगर येथील टपरी हातगाडी धारकांवर सलग दुसऱ्या दिवशी कारवाई करण्यात आली. या कारवाईला टपरी, पथारी, हातगाडी पंचायतीच्या वतीने विरोध करण्यात आला. राजकीय वरदहस्त लाभलेल्या व्यक्तीच्या कार्यकर्त्यांनी भाड्याने दिलेल्या टपऱ्या तसेच बंद असलेल्या टपऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी परवानाधारक आणि गोर गरिबांवर कारवाई करण्यात येत असल्याचा आरोप होत आहे. या कारवाई दरम्यान यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या टपरी, पथारी, हातगाडी पंचायत या संघटनेचा फलक हटवण्यात आला. स्थानिक राजकीय नेतृत्वावर टीका केल्यामुळे संघटनेचा फलक काढल्याचा समज झाल्याने संघटनेचे कार्यकर्ते संतप्त झाले. तसेच, या कारवाईला विरोध करणाऱ्या संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

कारवाईला आमचा विरोध…
कारवाईबाबत धर्मराज जगताप म्हणाले की, या परिसरात राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बेकायदेशीर टपऱ्या टाकून भाड्याने दिल्या आहेत. या शिवाय या परिसरातील एका राजकीय व्यक्तीने हॉटेलचे बेकायदेशीर बांधकाम केले आहे. तसेच, मेडिकल स्टोअर्सची बेकायदेशीर शेड आहेत. त्यांना राजकीय आश्रय असल्यामुळे त्यांच्या विरोधात कारवाई केली जात नाही. मात्र, गोरगरीब टपरी धारकांवरच कारवाई होत आहे. ही कारवाई करताना भेदभाव केला जात आहे. बेकायदेशीर टपऱ्यांवर कारवाई न करता पोटा-पाण्यासाठी स्वयंरोजगारासाठी टाकलेल्या टपऱ्यांवर केल्या जाणाऱ्या कारवाईला आमचा विरोध आहे.

दरम्यान, बाबा कांबळे यांनी घटनास्थळी जाऊन आमच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याऐवजी आम्हाला पण ताब्यात घ्या, अशी भूमिका घेतली. मात्र, पोलिसांनी कार्यकर्त्यांना समज देऊन काही वेळाने सोडून दिले. कारवाईला विरोध कायम ठेवत काही कार्यकर्ते क्रेन खाली झोपले. त्यामुळे या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने क्षेत्रीय आधिकारी आशा राऊत यांनी घटनास्थळी धाव घेतली. कारवाई दरम्यान काढलेला संघटनेचा फलक संघटनेस परत देण्याच्या पथकातील कमचाऱ्यांना सूचना केल्या. तसेच, एक हातगाडी व टपरीवरील कारवाई स्थगित केली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत