राजांच्या मनोमिलनाची साताऱ्यामध्ये तयारी?

Udayanraje-and-Shivendrasinhraje

सातारा : रायगड माझा वृत्त

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर साताऱ्यातील दोन राजांत पुन्हा एकदा मनोमिलन करण्याच्या हालचाली साताऱ्यात गतिमान झाल्या आहेत. त्यासाठी फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यातील मुहूर्त ठरविण्यात आला आहे.

साताऱ्यातील योद्धा प्रतिष्ठानच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने दोन राजांची मने एकत्र करण्याचे प्रयत्न होणार आहेत. त्यासाठी ज्येष्ठ नेते, माजी नगराध्यक्ष शिवाजीराजे भोसले यांना साकडे घातले जात आहे. याबाबत सध्या दोन्ही बाजूंच्या समर्थकांत जोरदार चर्चा असली तरी दोन्हीकडच्या निष्ठावंतांना मात्र, हे मनोमिलन रुचणार का, असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

राजघराण्यातील खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यातील वाद आणि मनोमिलनही जिल्ह्याला माहिती आहे. गेल्या वर्षी झालेल्या पालिका निवडणुकीपूर्वी दोन्ही राजांचे मनोमिलन फिस्कटले. त्यानंतर दोघांत टोकाचे मतभेद झाले. या वादात दोघांचेही निष्ठावंत होरपळून निघाले. पण, वाद कायमस्वरूपी उपयोगाचा नाही. तो एकामेकांच्या आगामी वाटचालीत काट्याप्रमाणे टोचू शकतो, हे ओळखून आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत दोघांचीही वाटचाल सुखरूप व्हावी, यासाठी एकमेकांपासून दुरावलेल्या दोन राजांचे पुन्हा मनोमिलन करण्याची प्रक्रिया सध्या साताऱ्यात सुरू आहे. त्यासाठी राजघराण्यातील ज्येष्ठ नेते शिवाजीराजे भोसले यांच्याकडे साकडे घातले जात आहे. सध्यातरी तेही सर्वांचे म्हणणे ऐकून घेत आहेत.

शहरात फार पूर्वीपासून कार्यरत असलेल्या योद्धा प्रतिष्ठानने कोटेश्‍वर मैदानावर फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात एक कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मनोमिलनाचा प्रयत्न होणार आहे. या कार्यक्रमास खासदार उदयनराजे व आमदार शिवेंद्रसिंहराजे हे दोघेही उपस्थित राहतील, असा विश्‍वास संयोजन समिती व्यक्त करत आहे. या कार्यक्रमास आमदार शशिकांत शिंदे यांनादेखील आमंत्रित करण्यात आले आहे.

कार्यकर्त्यांत मनोमिलनाची अपेक्षा 
दरम्यान, हा कार्यक्रम ज्येष्ठ नेते शिवाजीराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार असल्यामुळे दोन्ही राजांच्या कार्यकर्त्यांत मनोमिलन होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत