राज्यसभा दिवसभरासाठी स्‍थगित; संसदेत पुन्‍हा गदारोळ

नवी दिल्ली : रायगड माझा ऑनलाईन 

संसदेचे कामकाज सुरू होताच आज (२० डिसेंबर) पुन्‍हा गदारोळ सुरू झाला. विरोधी पक्षांनी राफेलप्रकरणी संयुक्‍त संसदीय समितीची (जेपीसी) मागणी करत, तर टीडीपी सदस्यांनी आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी करत गोंधळ सुरू केला. त्यामुळे राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी स्‍थगित करण्यात आले. लोकसभेचे कामकाजही सुरुवातीला दुपारी १२ आणि नंतर दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.

दरम्यान, संसदेचे अधिवेशन सुरू झाल्यापासून सातत्याने कामकाज स्‍थगित करावे लागत आहे. राफेल करार आणि शीख दंगलप्रकरणी न्यायालयाच्या निकालावरून काँग्रेससह विरोधकांचा संसदेत गोंधळ सुरू आहे. तर दुसरीकडे आंध्र प्रदेशमधील तेलगू देसम पक्षाच्या सदस्यांनी राज्याला विशेष दर्जाची मागणी लावून धरत गोंधळ घातल्याने कामकाजात अडथळे निर्माण होत आहेत. आज टीडीपी सदस्यांनी महात्‍मा गांधींच्या पुतळ्यासमोर आंदोलन केले.

राज्यसभेत गोंधळ आणि घोषणाबाजी सुरू झाल्यानंतर सभापती व्यंकय्‍या नायडू यांनी त्यांना शांततेचे आवाहन करत सभागृहात राफेल, शेती आणि चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानावर चर्चा होणे गरजेचे असल्याचे सांगितले. परंतु, गदारोळ कायम राहिल्याने कामकाज शुक्रवारी सकाळी ११ पर्यंत स्‍थगित करण्यात आले.

लोकसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर सदस्यांनी गोंधळ घातल्याने अध्यक्षांनी सुरुवातीला दुपारी १२ वाजेपर्यंत कामकाज स्‍थगित केले. १२ वाजता पुन्‍हा कामकाज सुरू झाल्यावरही गोंधळ कायमच राहिला त्यामुळे दुपारी २ वाजेपर्यंत लोकसभा तहकूब करण्यात आली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत