राज्याच्या राजकारणात अमोल कोल्हेंचं वजन वाढणार, राष्ट्रवादी देणार मोठी जबाबदारी

रायगड माझा वृत्त

लोकसभा निवडणुकीत प्रचाराची रणधुमाळी गाजवणारे आणि आता संसदेत राष्ट्रवादीचा आवाज बुलंद करणारे खासदार अमोल कोल्हे यांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीकडून मोठी जबाबदारी मिळणार आहे. त्यामुळे अमोल कोल्हे यांचे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये वजन वाढणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अभिनेते आणि शिवसेनेत कार्यरत असणाऱ्या डॉ. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर राष्ट्रवादीने शिरुर लोकसभा मतदारसंघातून अमोल कोल्हे यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत अमोल कोल्हे यांनी विजय मिळवत सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं होतं. आणि आता ते लोकसभेमध्ये महाराष्ट्राचा आवाज बुलंद करत विविध प्रश्नांवर आवाज उठवताना दिसत आहेत. अमोल कोल्हे यांनी संसदेत शेती, बैलगाडा शर्यत, गडकिल्ले अशा अनेक विषयांबाबत भाष्य करत सरकारचं लक्ष्य वेधून घेतलं होतं. यावेळी त्यांनी केलेली विषयांची मांडणी आणि वक्तृत्वशैली यामुळे कोल्हे यांचं कौतुक झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अभ्यासपूर्ण भाषण केल्याबद्दल काही मोजक्या खासदारांचा उल्लेख केला. त्यात अमोल कोल्हे यांच्या नवाचाही समावेश होता. म्हणूनच अमोल कोल्हे यांच्या कामगिरीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते खुश झाले आहेत. त्यांच्या या कामगिरीला आणखी बळकटी येण्यासाठी येत्या विधानसभा निवडणुकीत अमोल कोल्हे यांना पक्षाकडून मोठी जबाबदारी मिळणार असल्याचे संकेत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात केले आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वाधिक उमेदवार निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादीकडून नव्याने पक्षबांधणी सुरु करण्यात येत आहे. या पक्ष बांधणीत खासदार अमोल कोल्हे यांना आता कोणती जबाबदारी मिळते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत