राज्यातील कैद्यांकडून शेतीतून ३.८६ कोटींचे उत्पादन

पैठण येथील खुल्या कारागृहाने घेतले सर्वाधिक उत्पादन

पुणे : रायगड माझा वृत्त 

राज्यातील कारागृहांनी शेतीला आधुनिक यंत्रसामग्रीची जोड देत गेल्या काही वर्षांमध्ये उत्पादनात घसघशीत वाढ केली असून २०१७-१८ या वर्षांत ३.८६ कोटी रुपयांचे उत्पादन घेतले आहे. यातून या कारागृहांनी वर्षभरात सुमारे एक कोटी ५९ लाख रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे.

राज्यातील २९ कारागृहांमध्ये असलेल्या ८१९ हेक्टर जमिनीपैकी ३२७ हेक्टर क्षेत्रात शेती केली जाते. कारागृहांमधील कैद्यांना दैनंदिन तत्वावर रोजगार मिळवून देण्याचे काम या माध्यमातून होतेच शिवाय कैद्यांना दररोज आहारासाठी लागणाऱ्या पालेभाज्या, फळभाज्या आणि अन्नधान्याचे उत्पादनही त्यातून घेतले जाते. यात भात, गहू, ज्वारी, बाजरी व इतर पिकांचा समावेश आहे. २०१७-१८ या वर्षांत कारागृहांतील शेतीत ८१५ पुरुष आणि ३५ महिला कैद्यांना दररोज काम मिळाले आहे, अशी माहिती कारागृह विभागातील सूत्रांनी दिली. गेल्या काही वर्षांमध्ये खरीप, रब्बी आणि उन्हाळी अशा तीनही हंगामामध्ये केली जाणारी शेती कारागृह विभागाचा खर्च भागवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावू लागली आहे. काही कारागृहांमध्ये दूध आणि मासे यांचेही उत्पादन घेतले जाते. विसापूर आणि पैठणसारख्या कारागृहांमध्ये तर ऊस पिकवून तो जवळच्या साखर कारखान्यांना पुरवला जात आहे. शेतीसाठी आवश्यक असलेली यंत्रसामग्री खरेदी करण्यात आली आहे.  शेती उत्पन्नाच्या बाबतीत पैठण येथील खुल्या कारागृहाने प्रथम, विसापूरच्या कारागृहाने द्वितीय, तर नाशीकरोड खुल्या कारागृहाने तृतीय क्रमांक पटकावला आहे.

कैद्यांमध्ये सुधारणा व पुनर्वसनाचा प्रयत्न

राज्यातील कारागृहांजवळील शेतीपैकी १८६ हेक्टर क्षेत्र बागायती आणि १४० हेक्टर शेती ही कोरडवाहू आहे. याशिवाय १८० हेक्टर क्षेत्रात वनीकरण करण्यात आले असून साग, बांबू, चिंच, आंबा, वड, पिंपळ, जांभूळ, करंज अशी वनराई फुलली आहे. अजूनही शेतीच्या विस्ताराला वाव असून ८० हेक्टर जमीन पडिक स्थितीत आहे. कारागृह शेतीचा वापर हा मुख्यत: कैद्यांच्या सुधारणा व पुनर्वसनासाठी केला जातो. शेती उत्पादन तंत्रज्ञानाच्या उपयोगातून कैद्यांना ज्ञान मिळते आणि शिक्षा पूर्ण झाल्यानंतर त्यांना स्वयंपूर्ण होण्यास मदत होते. कैद्यांना रोजगारातून कमाई होण्यासाठी व त्यांच्या व्यावसायिक पुनर्वसनासाठी कारागृह विभागाने फळभाजी, पालेभाज्यांच्या उत्पादना व्यतिरिक्त रोपवाटिका देखील विकसित केल्या आहेत.

कारागृहाच्या आत चंदन वृक्षांची लागवड

काही कारागृहांमध्ये मत्स्यपालन, गांडूळ खत निर्मिती प्रकल्प कार्यान्वित झाले आहे. राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळाच्या अनुदानातून येरवडा खुले कारागृह येथे औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली. इतर १० कारागृहांमध्ये ३७ हेक्टर शेतीत चंदनाच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. चंदन वृक्षांच्या संगोपनाच्या दृष्टीने ही लागवड कारागृहाच्या चार भिंतीच्या आत करण्यात आली आहे, हे विशेष. गेल्या वर्षी कारागृहांनी ३.४८ कोटींचे उत्पादन घेऊन १.७५ कोटी रुपयांचा नफा कमावला होता.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत