राज्यात एकही तणमोर नाही?

वन विभाग, वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूटचे सर्वेक्षण

गेल्या 15 वर्षांत 80 टक्‍क्‍यांनी घटली संख्या

रायगड माझा वृत्त 

पुणे – वन विभाग आणि वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांनी नुकत्याच केलेल्या संयुक्‍त सर्वेक्षानुसार राज्यात एकही तणमोर आढळला नसल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे माळढोकपाठोपाठ आता तणमोरदेखील राज्यातून हद्दपार झालेत, की काय? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

देशभरातील लुप्त होत असलेल्या वन्यजीवांची माहिती घेण्यासाठी डेहराडून येथील वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियातर्फे विशेष सर्वेक्षण घेण्यात येत आहे. यामध्ये माळढोक आणि तणमोर या पक्ष्यांचादेखील समावेश आहे. दि.4 ते 22 ऑगस्टदरम्यान संपूर्ण देशात हे सर्वेक्षण घेण्यात आले असून आतापर्यंत फक्‍त मध्यप्रदेशात 11 तणमोर दिसल्याचे नोंद या सर्वेक्षणात झाली आहे.

गवताळ प्रदेशात आढळणाऱ्या या पक्ष्याचा रंग गवतासारखाच असल्याने तो सहजासहजी दिसत नाही. मात्र, सध्या या पक्ष्यांचा मिलन काळ असल्याने हा तणमोर गवतातून बाहेर पडतो. तसेच उंच उडून विशिष्ट आवाज काढत असतो. त्याच वेळी या पक्ष्याची नोंद घेतली जाते. हे पक्षी मुख्यत्वे पहाटे आणि सायंकाळी दिसतात. गेल्या वर्षी भिगवण, सोलापूर आणि नागपूर याठिकाणी प्रत्येकी एक याप्रमाणे तणमोराची नोंद झाली होती. विशेष म्हणजे, यापूर्वी झालेल्या सर्वेक्षणात या पक्ष्यांचे प्रमाण गेल्या 15 वर्षांत 80 टक्‍क्‍यांनी घटल्याचे समोर आले होते.

गेल्या काही वर्षामध्ये तणमोरांची संख्या झपाट्याने खालावली असून, संपुष्टात येणारे गवताळ प्रदेश, विजेच्या तारा, स्थानिक कुत्र्यांचा त्रास यामुळे हे पक्षी नामशेष होत असल्याचे वन्यजीव विभागाचे वनसंरक्षक आर. के.वानखेडे यांनी सांगितले आहे. गेल्यावर्षीच्या नोंदणीनुसार देशात 340 तणमोर आढळले होते.

वीज तारांमुळे तब्बल 32% पक्षांचे मृत्यू 
गवताळ प्रदेशात मानवी वस्ती वाढली. कालांतराने पायाभूत सोयी-सुविधादेखील निर्माण झाल्या. या सर्वांमुळे गवताळ प्रदेशात राहणाऱ्या पक्षांच्या नैसर्गिक आधिवासावर अतिक्रमण झाले. इतकेच नव्हे, तर या प्रदेशातील सुमारे 32 टक्के पक्षांच्या मृत्यू वीजेच्या तारांमुळे होत असल्याचे वनविभागाच्या निरीक्षणातून समोर आले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत