राज्यात पाण्याचे भीषण संकट

पुणे : रायगड माझा वृत्त 

पावसाळी हंगाम हा येत्या १५ ऑक्‍टोबर रोजी संपणार असताना, राज्यात पाणीसाठ्याची चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली असल्याचे निदर्शनास आले आहे. राज्यात असलेली धरणे आणि लहान मोठ्या तीन हजार २६६ पाणी प्रकल्पांमध्ये अवघे ६४ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला असून, गेल्या वर्षी आतापर्यंत सुमारे ७५ टक्के धरणे भरली होती. सर्वाधिक भीषण परिस्थिती मराठवाडा विभागात असून, त्याखालोखाल नागपूर, अमरावती आणि नाशिकमध्ये पाणी संकट उभे राहिले आहे. पुणे जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत पाणीसाठा कमी असल्याने पाण्यावरून आगामी काळात शहर विरुद्ध ग्रामीण अशा वादाला तोंड फुटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. दर वर्षी समाधानकारक पाऊस पडणाऱ्या कोकण विभागातही पाणीप्रश्न उभा राहण्याची शक्यता जलसंपदा विभागाने वर्तवली आहे.

आता पाऊस ऑक्टोबरपर्यंत सुरू असतो. त्यामुळे जलसंपदा विभागाकडून १५ ऑक्टोबरपर्यंतच्या पाणीसाठ्यावरून आगामी पावसाळ्यापर्यंतचे पाण्याचे नियोजन करण्यात येते. हा हंगाम संपण्यास जेमतेम तीन दिवस उरले असताना, जलसंपदा विभागाने राज्यातील मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्पांमध्ये असलेल्या पाणीसाठ्याचा आढावा घेतला आहे. त्यानुसार राज्यात १४० मोठी धरणे असून, २५८ मध्यम प्रकल्प आणि दोन हजार ८६८ लघु प्रकल्प आहेत. या विविध धरणे आणि लघु प्रकल्पांमध्ये असलेला पाणीसाठा हा सुमारे ६४ टक्के असल्याचे उघड झाले आहे. गेल्या वर्षी आतापर्यंत हा पाणीसाठा सुमारे ७६ टक्के होता. त्यामुळे यंदा पाण्याबाबतीत चिंताजनक परिस्थिती होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज्यात पुणे, अमरावती, कोकण, नागपूर, नाशिक आणि मराठवाडा असे सहा विभाग असून, यापैकी सर्वांत कमी पाणीसाठा हा मराठवाडा विभागातील धरणांमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. या धरणांमध्ये सुमारे २६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी या दिवसापर्यंत सुमारे ६७ टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे आगामी काळात मराठवाडा प्रदेशामध्ये पाण्याबाबतीत भीषण परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता जलसंपदा विभागाकडून वर्तविण्यात येत आहे.
मराठवाडा विभागानंतर नागपूर विभागामध्ये परिस्थिती अडचणीची झाली आहे. या विभागातील धरणे आणि विविध प्रकल्पांमध्ये सुमारे ४५ टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्यावर्षी या विभागातील धरणे सुमारे ४० टक्के धरली होती. मराठवाडा आणि नागपूर या विभागांनंतर अमरावती विभागांमध्येही पाणीसाठ्याबाबतीत टंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या विभागातील धरणांमध्ये सुमारे ५६ टक्के पाणीसाठा आहे. मात्र, जमेची बाजू म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत या भागात तुलनेने जास्त पाऊस पडला आहे. गेल्या वर्षी अवघा ३९ टक्के पाणीसाठा होता.

पुण्यात पाणीसाठा कमी
पुणे जिल्ह्यात प्रमुख धरणांबरोबर ७२६ मध्यम आणि लघु प्रकल्प आहेत. धरणे आणि प्रकल्पांमध्ये सुमारे ८० टक्के पाणीसाठा असल्याचे उघड झाले आहे. गेल्यावर्षी या दिवसापर्यंत सुमारे ९१ टक्के धरणे भरली होती. त्यामुळे पुणे शहर आणि जिल्ह्याच्या पाणीसाठ्याबाबतीत परिस्थिती निराशाजनक असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

नाशिकमध्येही चिंता 
नाशिक विभागामध्येही चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. या विभागातील धरणांमध्ये सुमारे ६५ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी या विभागातील धरणे सुमारे ८० टक्के भरली होती. त्यामुळे नाशिक विभागातही आगामी काळात पाण्याबाबतीत परिस्थिती आव्हानात्मक होण्याची चिन्हे आहेत.

कोकणातही कमतरता
कोकण विभागात दर वर्षी पावसाचे प्रमाण जास्त असते. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी या विभागातील धरणांमध्ये पाणीसाठा कमी आहे. गेल्या वर्षी सुमारे ९५ टक्के धरणे भरली होती. या वर्षी हे प्रमाण ८८ टक्क्यांवर आहे. त्यामुळे राज्यात पाण्याबाबतीत एकंदरीत परिस्थिती चिंताजनक असल्याचे जलसंपदा विभागातील माहितीवरून निदर्शनास आले आहे.

पुण्यातील धरणसाठा अब्ज घनफूटमध्ये 

धरण टीएमसी टक्के
टेमघर १.३५ ३६.५०
वरसगाव १२.७४ ९९.३३
पानशेत १०.०७ ९४.५५
खडकवासला १.४५ ७३.५३

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत