राज्यावर “आभाळमाया’

पुणे विभागावर पाऊस अजूनही रुसलेलाच 

काही भागांत अतिवृष्टी होण्याची शक्‍यता

रायगडसह कोकणात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या 

पुणे : रायगड माझा

राज्यात सर्वत्र  पावसाला आता दमदार सुरूवात झाली आहे. गेल्या दोन दिवसांत राज्यातील बहुतांशी भागात चांगला पाऊस झाला असून यामुळे शेतीच्या कामांना वेग आला आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, राज्यातील काही भागात अतिवृष्टीचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर, पुणे विभागात मात्र पाऊस अजूनही रुसलेलाच असल्याचे चित्र आहे.

जूनमध्ये ओढ दिल्यानंतर आता जुलैच्या सुरूवातीपासूनच राज्यात पावसाचे दमदार आगमन झाले आहे. आगमनापासूनच कोकणात चांगला पाऊस पडत आहे. पण, राज्यात इतरत्र पावसाने दडी मारली होती. विशेषत: मध्य महाराष्ट्रात पाऊस झाला नव्हता. पण, गेल्या दोन दिवसांपासून मध्य महाराष्ट्रात ही अनेक ठिकाणी चांगला पाऊस पडत आहे. कोकणातील रत्नागिरी,सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधील गावांमध्ये पावसाची संततधार आहे. सावतंवाडी, मालवण भागात 100 मिलीमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे.
सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरसुद्धा चांगला पाऊस होत आहे. त्यामुळे घाट माथ्यावर निसर्गसृष्टी बहरू लागली आहे. अनेक ठिकाणी धबधबे फेसाळले आहेत. घाट माथ्यावरील पेरणीच्या कामांना वेग आला आहे. लोणावळा येथे बुधवारी 60 मिलिमीटर, ताम्हिणी घाटातही 70 मिमी.पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. मुळशी-मावळ परिसरात असणाऱ्या धरणारच्या पाणलोट क्षेत्रातही गेले दोन ते तीन दिवसांपासून चांगला पाऊस होत आहे.
सातारा, सांगली, कोल्हापूर भागात ही चांगल्या पावसाची नोंद झाली आहे. मराठवाड्यात अनेक ठिकाणी भिजपाऊस सुरु झाला आहे. हवामान ढगाळ आहे. तर विदर्भातसुद्धा अनेक भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. विदर्भातील गोंदिया, अमरावती, चंद्रपूर, बल्लाळ, देवळी याभागात चांगला पाऊस झाला आहे.

येणारे दिवस पावसाचेच : हवामान विभाग
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, राज्यात या आठवड्यात सर्वदूर पाऊस पडणार आहे. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण झाले आहे. त्याचा प्रभाव महाराष्ट्रासह मध्यप्रदेश व ओरिसा आणि पाश्‍चिम बंगाल या राज्यांमध्ये राहणार आहे. त्यामुळे या भागात येत्या दोन ते तीन दिवस चांगला पाऊस होणार आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा हा कोकण आणि गुजरात किनारपट्टीच्या दिशेने सरकल्याने या भागातही चांगला पाऊस पडत आहे. उलट 7 व 8 जुलैदरम्यान कोकण आणि गुजरात किनारपट्टीवर अतिवृष्टीचा अंदाज आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत