औरंगाबाद : रायगड माझा वृत्त
मराठवाडा दौऱ्यावर असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी आज (ता.20) जायकवाडी येथील नाथसागराला भेट दिली.
औरंगाबाद आणि मराठवाड्याच्या काही भागाची तहान आणि सिंचनाचा प्रश्न सोडवणारे जायकवाडी जलाशय पाहून ठाकरे पिता-पुत्र चांगलेच भारावले. विस्तीर्ण आणि नजर जाईल तिथे पाण्याने भरलेला नाथसागर पाहत या दोघांनी अर्धा तास निरीक्षण करत चर्चाही केली.
राज ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्याचा आज दुसरा दिवस. गुरुवारी शहरात पत्रकार परिषद आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतल्यानंतर राज ठाकरे मनसेचे जिल्हाध्यक्ष व बिडकीन येथील जिल्हा परिषदेचे सदस्य विजय चव्हाण यांनी केलेल्या विकासकामांच्या उद्घटनासाठी बिडकीनला गेले होते. त्यानंतर पैठण येथील संत एकनाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतल्यावर राज ठाकरे व अमित ठाकरे जायकवाडी धरण पाहण्यासाठी गेले.
नाशिक व पश्चिम महाराष्ट्राच्या भागात चांगला पाऊस झाल्याने नुकतेच जायकवाडी धरणात पाणी यायला सुरूवात झाली. गेल्यावर्षीही पावसाने कृपा केल्यामुळे आजघडीला जायकवाडी पाण्याने अर्धे भरलेले आहे. अशात राज यांनी धरणाच्या मुख्य भिंतीवर फिरत अथांग पसरलेला नाथसागर न्याहाळला . यावेळी अमित ठाकरेही त्यांच्या सोबत होते.
राज ठाकरे मराठवाडा दौऱ्यात अमित ठाकरे यांना सोबत ठेवत आहेत . राज ठाकरे कार्यकर्त्यांशी कसे बोलतात कसे वागतात हे अमित ठाकरे जवळून पाहत आहेत. त्यांच्याबरोबर नवीन प्रदेश आणि नवीन माणसे समजावून घेत आहेत . अमित ठाकरे या दौऱ्यातून बरेच काही समजावून घेतील असे कार्यकर्त्यांना वाटते . या निमित्ताने अमित ठाकरे कार्यकर्त्यांना भेटत आहेत . अमित ठाकरे यांची कार्यकर्त्यात आणि तरुणात क्रेझ असल्याचे जॊगोजागी होणाऱ्या गर्दीवरून दिसत आहे .