राज ठाकरेंचे उद्धव ठाकरेंना पत्र!

मुंबई : रायगड माझा वृत्त 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात मतभेद असले तरी एका मुद्द्यावर मात्र ठाकरे बंधू एकत्र येताना दिसत आहेत. निवडणुकीत ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेचा वापर करावा अशी मनसेची मागणी असून याच मुद्द्यावर राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे.

राज ठाकरे यांनी पत्रात मनसेच्या मागणीला शिवसेनेने पाठिंबा द्यावा असं आवाहन केलं आहे. ईव्हीएमवर बंदी आणूया, किंवा निवडणुकांवर बहिष्कार घालूया असं राज ठाकरेेंनी पत्रात म्हटलं आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकतीच ईव्हीएमच्या मुद्द्यावर बैठक बोलावली होती. या बैठकीला सर्व पक्षांचे प्रतिनिधी हजर होते. भाजपा वगळता जवळपास सर्वच पक्षांनी ईव्हीएम प्रक्रियेला विरोध केला असून, मतपत्रिकेद्वारे निवडणूक घेण्याची मागणी केली आहे. दिल्लीत पार पडलेल्या या बैठकीत याच मुद्द्यावर चर्चा झाली. या बैठकीला शिवसेना आणि मनसेचे प्रतीनिधीही उपस्थित होते.

राज ठाकरे यांनीही नेहमीच ईव्हीएम मतदानावर संशय व्यक्त करत विरोध दर्शवला आहे. याच मुद्द्यावर त्यांनी सर्व राजकीय पक्षांना पत्र लिहिलं आहे. पत्रात त्यांनी निवडणूक प्रक्रिया आणि ईव्हीएम मशीनसंदर्भात मुद्दे मांडले आहेत.

राज ठाकरे यांनी हे पत्र उद्धव ठाकरे यांनाही पाठवलं आहे. पत्रात राज ठाकरे यांनी ईव्हीएमच्या मुद्द्यावर शिवसेनेने पाठिंबा देण्याचं आवाहन केलं आहे. दरम्यान दुसरीकडे, ईव्हीएमच्या मुद्द्यावर का होईना पण ठाकरे बंधू एकत्र आल्याने पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत