राज ठाकरेंचे औरंगाबाद मध्ये  व्हिजन पॉलिटिक्स

औरंगाबाद : रायगड माझा वृत्त 

” तुम्ही राजकारणाचे बळी ठरला आहात, घाबरून मतदान करता.आधी तुम्ही बदला मग शहर बदलेल .  संधी द्या, स्वच्छ आणि सुरक्षित शहर देतो.” असा शब्द राज ठाकरे यांनी औरंगाबादवासीयांना दिला. औरंगाबाद व्हिजन  कार्यक्रमात त्यांनी शहरातील विविध क्षेत्रातील व्यक्तीशी संवाद साधला.

नाशिकनंतर आता औरंगाबाद शहरावर राज ठाकरे यांनी लक्ष केंद्रित केले आहे. “विकास कामांवर मतदान होतं याच्यावरचा माझा विश्वासच उडाला आहे. तुम्ही विकासाला मतदानच करत नाही. अडचणीच्या वेळीच तुम्हाला राज ठाकरे आठवतो असा टोला लागवतानाच नाशिक महापालिकेत झाले तसे काम तुमच्या शहरात देखील होऊ शकते ,”असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

गेल्या २५ वर्षात तुमचे शहर आणि खासदार काहीच बदलले नाही असा चिमटा काढत लोकप्रतिनिधींना तुमची भीतीच वाटत नसल्याची टीका राज ठाकरे यांनी केली. ते म्हणाले ,”त्यामुळेच कचरा प्रश्‍न तसाच रेंगाळत पडला आहे. नाशिकला आम्ही काही नसतांना खूप चांगल्या गोष्टी केल्या. तुमच्याकडे तर जगप्रसिद्ध अजिंठा, वेरुळ लेण्या आहेत.जगभरातील विमानं तुमच्या शहरात उतरायला हवीत. या लेण्यांची योग्य काळजी आणि मार्केटिंग केले तर महाराष्ट्राला हजारो कोटी मिळतील.”

 ” राजकारण आणि मतदान हसण्यावारी घेऊ नका असे आवाहन राज ठाकरे यांनी उपस्थितांना केले. छोट्या मोठ्या घटनांना घाबरू नका, एकदा मला संधी द्या, मग बघतो तुम्हाला कोण हात लावतो ते ,”असा विश्वास व्यक्त करतानाच पुढच्या वेळी येईल तेव्हा शहराच्या विकासाचा आराखडा तुमच्या समोर ठेवीन असा शब्द देखील राज ठाकरे यांनी यावेळी दिला.

राज ठाकरेंचे हे व्हिजन पॉलिटिक्स औरंगाबादकर खरंच गांभीर्याने  घेतात का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत