“राज ठाकरेंना नोटीस !; अ‍ॅमेझॉनला सह्याद्रीचं पाणी पाजणार”

महाराष्ट्र News 24

न्यायालयाने नोटीस पाठवल्यानंतर मनसेने आपण भूमिकेवर ठाम राहणार असल्याचं सांगताना यासाठी मोठी किंमत मोजावी लागेल असा इशारा अ‍ॅमेझॉनला दिला आहे. राज ठाकरेंना नोटीस पाठवणाऱ्या अ‍ॅमेझॉनला सह्याद्रीचं पाणी पाजणार अशी प्रतिक्रिया मनसे नेते अखिल चित्रे यांनी बोलताना दिला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिंडोशी न्यायालयाने नोटीस पाठवली असून यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये अ‍ॅमेझॉनसोबतचा वाद चिघळण्याची शक्यता आहे.

मनसेने सुरु केलेल्या मराठी भाषेच्या मोहिमेविरोधात अ‍ॅमेझॉनने कोर्टात धाव घेतली आहे. यानंतर दिंडोशी कोर्टाकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नोटीस बजावण्यात आली आहे. कोर्टाने राज ठाकरे आणि काही मनसे सचिवांना ५ जानेवारीला कोर्टात हजर राहण्याचा आदेश दिला आहे.  राज ठाकरेंना नोटीस पाठवल्यानंतर मनसे नेते अखिल चित्रे यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी ते म्हणाले की, “मनसे आपल्या भूमिकेवर ठाम आहे. अ‍ॅमेझॉनला महाराष्ट्रात व्यवसाय करु देत आहे हे विसरता कामा नये. अ‍ॅमेझॉनला सह्याद्रीचं पाणी पाजणार हे नक्की आहे”.

पुढे ते म्हणाले की, “खटले दाखल करण्याचा प्रयोग त्यांनी सुरु केला आहे. १९ तारखेला माझ्याविरोधात केस टाकली होती. आता राज ठाकरेंना नोटीस पाठवण्याचं दुसाहस त्यांनी केलं आहे. याची किंमत त्यांना मोजावी लागणार आहे. अशा फालतू नोटीसला आम्ही फार किंमत देत नाही. मराठीसाठी कोणत्याही केसेस अंगावर घेण्याची तयार आहोत हे अ‍ॅमेझॉनने लक्षात ठेवावं”.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत