राज ठाकरे यांचे आवाहन; मराठी मंडळींनो, मुंबईत संस्था काढा

रायगड माझा वृत्त 

राज ठाकरे यांचे आवाहन; फणसळकरांचा केला गौरव

‘सध्या देशात सर्वत्र इंच इंच विकू अशी परिस्थिती असताना, शिक्षणासाठी वाहून घेतलेली महाराष्ट्रीय मंडळ ही संस्था मोलाचे काम करत आहे,’ या शब्दांत गौरव करतानाच, ‘मुंबई गुजराती-मारवाड्यांना आंदण दिलेली नाही. त्यामुळे, मराठी मंडळींनी यासारख्या संस्था मुंबईतही उभ्या करणे गरजेचे आहे’, अशी अपेक्षा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी व्यक्त केली.

महाराष्ट्रीय मंडळाचे माजी सरचिटणीस रमेश दामले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ठाण्याचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांना ठाकरे यांच्या हस्ते ‘प्राइड ऑफ महाराष्ट्रीय मंडळ’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी ठाकरे यांनी संस्थेचा गौरवोद्गार करतानाच, फणसळकर यांचीही मुक्तकंठाने प्रशंसा केली. संस्थेसोबत अत्यंत जुन्या काळापासून ऋणानुबंध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘सर्वप्रथम अटक झाली, त्यावेळी आरोपीशी मैत्री करणारा पोलिस म्हणजे विवेक फणसळकर’ अशी आठवण सांगून ‘मुंबईमध्ये अनेक अमराठी पोलिस अधिकारी कार्यरत असताना फणसळकर यांच्यासारखी मराठी व्यक्ती उच्चपद भूषवित असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. भविष्यात मुंबईचे पोलिस आयुक्तपद त्यांना मिळावे’, अशी सदिच्छाही त्यांनी व्यक्त केली. सर्व पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांमुळेच अजूनही शांतता-सुव्यवस्था टिकून असल्याचेही ठाकरे यांनी नमूद केले.

संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले, सरचिटणीस धनंजय दामले आणि मुंबईचे माजी पोलिस आयुक्त श्रीकांत बापट या वेळी उपस्थित होते. गोखले आणि बापट यांनीही विचार व्यक्त केले. दामले यांनी प्रास्ताविक केले. मंगेश वाघमारे यांनी सूत्रसंचालन केले. राज ठाकरे यांच्या हस्ते महाराष्ट्रीय मंडळाच्या वाणिज्य महाविद्यालयाचे कै. रमेश दामले वाणिज्य महाविद्यालय असे नामकरण करण्यात आले.

‘पुरस्कार पोलिस बांधवांना अर्पण’

‘अनेक वर्षांनंतर माहेरी जाणाऱ्या एखाद्या महिलेच्या मनात काय भावना असू शकतात, याची प्रचिती पुन्हा शाळेत सत्काराला येताना होत आहे’, या प्रांजळ शब्दांत भावना व्यक्त करतानाच फणसळकर यांनी शाळेतील अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. फणसळकर यांना शिकविणाऱ्या अनेक शिक्षिका या वेळी आवर्जून प्रेक्षागृहात उपस्थित होत्या. शाळेने दिलेल्या संस्कारांचे ऋण कधीही फेडता येऊ शकणार नाहीत, असे सांगतानाच, पुरस्काराच्या रकमेत आणखी ११ हजारांची भर घालून २१ हजार रुपयांची देणगी शाळेला देत असल्याचे त्यांनी जाहीर केले. तसेच, संविधानाने नागरिकांना दिलेल्या हक्काच्या संरक्षणासाठी सदैव झटणाऱ्या पोलिस बांधवांना हा पुरस्कार अर्पण करत असल्याचे सांगताना पोलिसांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत