राफेल आल्यामुळं चुटकीसरशी आपल्या सर्व चिंता मिटतील हा गैरसमज – शरद पवार

मुंबई : महाराष्ट्र News 24

 फ्रान्समधील कंपनीकडून राफेल ही लढाऊ विमाने खरेदी करण्याचा अनेक वर्षांपासून रखडलेला करार मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात पूर्णत्वास गेला. सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर आज ही विमाने भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात दाखल झाली आहेत. त्या पार्श्वभूमीवर ‘सीएनएन न्यूज १८’ या वृत्तवाहिनीशी बोलताना पवार यांनी आपलं मत मांडलं. ‘राफेल विमानं आपल्याकडं असणं हे चांगलंच आहे, यात दुमत नाही. मात्र राफेल आल्यामुळं चुटकीसरशी आपल्या सर्व चिंता मिटतील असा जो काही समज पसरवला जातोय तो चुकीचा आहे,’ असं ते म्हणाले.

‘राफेल विमाने भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात समाविष्ट होणं ही आपल्या देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं चांगली गोष्ट आहे. पण, ही विमाने गेमचेंजर वगैरे ठरणार नाहीत. त्यामुळं चीनची चिंता वाढेल असं मला वाटत नाही,’ असं रोखठोक मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे.

‘भारताच्या संरक्षण सिद्धतेकडे आणि तयारीकडे चीन गंभीरपणे पाहत असेल यात शंका नाही. मात्र, राफेल आल्यामुळं चीनची चिंता वाढेल, असं मला अजिबातच वाटत नाही. चीनची ताकद आपल्यापेक्षा कितीतरी पट जास्त आहे. लष्करी ताकदीच्या बाबतीत त्यांच्याशी आपली तुलना होऊ शकत नाही. आपल्याकडं दहा लढाऊ विमानं असतील तर त्यांच्याकडं हजार आहेत. एवढा हा फरक आहे,’ असंही पवार यांनी सांगितलं.

‘राफेल विमानं खरेदी करण्याचा निर्णय खूप जुना आहे. काँग्रेसनं त्यासाठी पुढाकार घेतला होता. खरेदी कराराची प्रक्रिया देखील खूप वर्षांपूर्वी सुरू झाली होती. भाजपच्या कार्यकाळात ती पूर्ण झाली. त्यामुळं यात कुणी श्रेय घेण्याचा आणि वाद होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही,’ असंही पवार म्हणाले.

राफेल विमानांच्या खरेदीच्या मुद्द्यावरून काँग्रेसनं मोदी सरकारला चांगलंच कोंडीत पकडलं होतं. राफेल खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला होता. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात हा मुद्दा प्रमुख ठरला होता. मात्र, मोदी सरकारनं विचलित न होता हा करार पूर्ण केला आणि आता विमाने आली आहेत. त्यामुळं आतातरी राफेल घोटाळ्याचा मुद्दा निकाली निघणार का हे पाहावं लागणार आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत