राफेल विमानाच्या खरेदीचे तपशील केंद्र सरकारकडून सादर

नवी दिल्ली : रायगड माझा ऑनलाईन 

राफेल विमानाच्या खरेदी घोटाळ्यावरील वादाने राजकीय वळण घेतलं आहे. त्यामुळे या प्रकरणाबाबत सर्वोच्च न्यायालयातही याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावर सुनावणी करतेवेळी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला राफेल खरेदीचे तपशील सादर करण्यास सांगितले होते. त्यानुसार सोमवारी केंद्र सरकारतर्फे राफेल खरेदीचे तपशील सादर केले आहेत.

आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाकडे एकूण 9 दस्तावेज सादर केले आहेत. यात या संपूर्ण प्रक्रियेची पार्श्वभूमी आणि एकूण प्रक्रिया विशद करण्यात आली आहे. या दस्तावेजांनुसार, राफेल विमान खरेदी प्रकिया 2013 अंतर्गत या विमानांची खरेदी केली गेली आहे. यासाठी सुरक्षा परिषदेची मंजुरी घेणे आवश्यक असते, ती देखील घेण्यात आली होती. त्यासाठी हिंदुस्थानने फ्रान्सशी बोलणीही केली होती, असं या दस्तावेजांमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

फ्रान्सशी या खरेदीबाबतची बोलणी तब्बल एक वर्ष सुरू होती आणि करारावर स्वाक्षरी करण्यापूर्वी मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीचीही मंजुरी घेण्यात आली होती. या व्यवहारातील भागीदार निवडीच्या प्रक्रियेत केंद्र सरकारची कोणतीही भूमिका नव्हती. हा निर्णय विमान निर्मिती करणाऱ्या डेसाल्ट एव्हिएशन कंपनीने घेतला होता, असंही या दस्तावेजांमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत