राम मंदिराच्या मुद्द्यावरुन शिवसेना पुन्हा एकदा आक्रमक; शिवसेनेचा चलो अयोध्या, चलो वाराणसी’ चा नारा!

मुंबई : रायगड माझा वृत्त 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्या आणि वाराणसीत जाऊन राम दर्शन आणि गंगा पूजा करण्याची घोषणा करताच मुंबईत शिवसैनिकांनी ‘चलो अयोध्या, चलो वाराणसी’ असे फलक लावले आहेत. भाजपाकडून राम मंदिराचे आश्वासन पूर्ण होत नसल्याने हिंदू मतांना शिवसेनेकडे वळवण्यासाठी पक्षाने ही खेळी खेळल्याचे सांगितले जाते.

राम मंदिराच्या मुद्द्यावरुन शिवसेना पुन्हा एकदा आक्रमक; शिवसेनेचा चलो अयोध्या, चलो वाराणसी’ चा नारा!

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वाराणसी आणि अयोध्या येथे जाण्याची घोषणा करताच शिवसेनेच्या वतीने मुंबईत आमदार मिलिंद नार्वेकर यांनी पोस्टर लावले आहेत. या पोस्टरमध्ये ‘चलो अयोध्या, चलो वाराणसी, देशाच्या राजकारणातील महत्त्वाकांक्षी पाऊल’, असे या पोस्टरवर लिहीण्यात आले असून या दौऱ्यात शिवसैनिकांनी सामील व्हावे, असे आवाहन देखील करण्यात आले आहे. २०१९ च्या निवडणुकीत भाजपाची कोंडी करुन हिंदू मते स्वतःकडे वळवण्यासाठी शिवसेनेने या दौऱ्याचे आयोजन केल्याचे समजते.

भाजपाकडून शिवसेनेच्या मनधरणीचे प्रयत्न सुरु असले तरी शिवसेनेने मात्र आगामी निवडणूक स्वबळावर लढवण्याचा पवित्रा कायम ठेवला आहे. संसदेतील अविश्वास प्रस्तावातही शिवसेनेने तटस्थ भूमिका घेत भाजपाला हादरा दिला. शिवसेनेच्या मुखपत्रातूनही वारंवार भाजपावर टीका केली जात असून या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन आक्रमक भूमिका घेत भाजपाची मते फोडण्याचा प्रयत्न केला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत