रायगडच्या राजकारणाला घराणेशाहीचा विळखा!

जिल्ह्याचे राजकारण आपल्या मुठीत ठेवण्याचे प्रयत्न

  • पाटील कंपनीनंतर तटकरेंचं अख्खं कुटुंब राजकारणात
  • पनवेलमध्ये ठाकूर तर पेणमध्ये पाटील कुटुंब
  • लाड, गोगावले, जगतापांचे देखील राजकीय वारस
  • रायगडच्या राजकारणावर आहे घराणेशाहीचं वर्चस्व

रायगड माझा वृत्त |

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने विधान परिषदेच्या कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून अनिकेत तटकरे यांना उमेदवारी दिली. या उमेदवारीमुळे तटकरेंवर घराणेशाहीचा आरोप होऊ लागला आहे . मुंबईच्या उंबरठ्यावर असलेल्या रायगड च्या अर्थकारणावर आपला अंकुश असावा यासाठीच जिल्ह्याचे राजकारण आपल्या मुठीत ठेवण्याचे प्रयत्न रायगडच्या राजकारणातील घराण्यांकडून सातत्याने होत असून त्याला कोणताही प्रमुख पक्ष अपवाद राहिलेला नाही .

कोकण आणि मुंबईला जोडणारा जिल्हा अशी रायगडची ओळख आहे. मुंबईला लागून असल्याने मोठमोठे प्रकल्प रायगड मध्ये आले. येथील मधील जमिनींना सोन्याचा भाव आला. यातूनच सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे समीकरण उदयास आले. आपल्या भागातील राजकारण ताब्यात ठेवण्यासाठी घराणेशाहीचा उदय झाला.

रायगडच्या राजकारणावर प्रदीर्घ काळ शेतकरी कामगार पक्षाचा पगडा राहिला. त्यातही पाटील कुटुंबाचे वर्चस्व राहिले. ग्रामपंचायत, नगर परिषद, पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद असो आपल्याच कुटुंबातील व्यक्तीच्या हाती सत्ता देताना कार्यकर्त्यांच्या हाती मात्र झेंडा राहिला. प्रभाकर पाटील रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते, त्यानंतर पंडित पाटील. सुप्रिया पाटील यांनी देखील हे पद सांभाळले, आता आस्वाद पाटील जिल्हापरिषदेचे उपाध्यक्ष आहेत, सुप्रिया पाटील यांचे भाऊ प्रशांत नाईक हे अलिबागचे नगराध्यक्ष आहेत, चित्रलेखा पाटील या स्वीकृत नगरसेविका आहेत. जयंत पाटील विधान परिषदेचे आमदार आहेत तर पंडित पाटील अलिबागचे आमदार आहेत .आपल्या प्रभाव क्षेत्रातील सहकारापासून राजकारणापर्यंत सर्व पद आपल्याच घरात .

बरं हे पाटील कंपनीचे एकमेव उदाहरण नाही, तर त्यांच्या जोडीने तटकरे देखील यामध्ये मागे नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि राज्याच्या राजकारणातील एक वजनदार नेते म्हणून सुनिल तटकरेंची ओळख आहे .पण त्यांनाही घराणेशाही मोह टाळता आला नाही.

सुनील तटकरे आमदार, अनिल तटकरे आमदार , अवधूत तटकरे आमदार , अदिती तटकरे जिल्हा परिषद अध्यक्षा आणि आता अनिकेत तटकरे विधान परिषदेचे उमेदवार आहेत. त्यामुळे हि घराणेशाही अधिक प्रखरपणे समोर आली आहे .
माजी मंत्री पेणचे रवीशेठ पाटील यांच्यावर देखील हा आरोप सातत्याने होत आहे. त्यांच्या पत्नी कौसल्याताई, मुलगा वैकुंठ हे रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य राहिले आहेत. पेण नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद आपल्याच कुटुंबाच्या ताब्यात ठेऊन पर्यायाने पेणचे राजकारण आपल्या कुटुंबाच्या हाती ठेवण्याचा त्यांचा सातत्याने प्रयत्न राहिला आहे.

पेणचे आमदार धेर्यशील पाटील यांच्या पत्नी नीलिमा पाटील या जिल्हा परिषदेच्या सदस्या आहेत. राष्ट्रवादी आणि शेकाप करारानुसार त्या जिल्हा परिषदेच्या भावी अध्यक्षा असल्याचे बोलले जात आहे. पनवेल मध्येही परिस्थिती वेगळी नाही. रामशेठ ठाकूर माजी खासदार, प्रशांत ठाकूर आमदार, परेश ठाकूर महानगरपालिकेचे गटनेते हि पनवेलची स्थिती. महाडमध्ये भारत गोगावले, माणिक जगताप असो कि कर्जतचे सुरेशभाऊ लाड असो प्रत्येकाने आपल्या कुटुंबात आपल्या भागातील सत्तास्थाने ताब्यात ठेवण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे.

पक्षाचे पद असो कि राजकीय पद, प्रत्येक ठिकाणावर आपल्याच कुटुंबातील व्व्यक्तींचीच नेमणूक व्हावी यासाठी अनेकदा सोईचे राजकारण देखील केले जाते. नेत्यांच्या या महत्वकांक्षेत भरडला जातो तो कार्यकर्ता. निवडणुकीत नेत्यांसाठी वैर पत्करायचे, पक्षाचा झेंडा खाली पडू नये याशी संघर्षाची भूमिका कार्यकर्त्यांनी घ्यायची आणि निवडणुकीत उमेदवारी द्यायची वेळ येताच कार्यकर्त्याला बाजूला करून कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी द्यायची. अनिकेत तटकरे यांच्या उमेदवारीमुळे घराणेशाहीचा मुद्दा आता प्रकर्षाने समोर आला असून रायगडच्या राजकारणात याचे पडसाद उमटणार हे मात्र नक्की…

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत